Amravati News अमरावती : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांची दखल न घेतल्याने एका आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अमरावतीच्या(Amravati) मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मंडपातच एका प्रकल्पग्रस्ताने आत्महत्या केली आहे.

गोपाल दहिवडे असे या आत्महत्या करणाऱ्या आंदोलक प्रकल्पग्रस्ताचे नाव असून ते मूळचे टाकरखेड येथील रहिवासी आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोर्शी तहसील कार्यालयासमोर 252 दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याने गोपाल दहिवडे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. यावेळी त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यूमागे शासन जवाबदार असल्याचे म्हटले आहे. 

मागण्यांची पूर्तता न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल 

अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे. या सर्व शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात 252 दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

मात्र या आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याच्या कारणातून टाकरखेड येथील रहिवासी असलेल्या गोपाल दहिवडे यांनी आंदोलनाच्या मंडपात पंख्यावर दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आंदोलनकर्त्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

माझ्या आत्महत्येला शासन जबाबदार

मृत आंदोलक गोपाल दहिवडे यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यू मागे शासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी मध्ये लिहलं की, माझ्या मरणाला शासन, प्रशासन जबाबदार आहे. परंतु उमेशभाऊ चळवळ बंद करायची नाही.  माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेवू देऊ नये. सरकार बेकार आहे,  न्याय मागा, असे मजकूर असलेल्या चिठ्ठ्या मृत आंदोलक गोपाल दहिवडे यांच्या गळ्यात आढळून आल्या आहे. या घटनेनंतर अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर रास्तारोको करत आंदोलन सुरू केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link