Amravati News अमरावती : राज्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election) निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याकरिता सर्वच पक्षांनी आपापल्यापरीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीका होत असतानाच संभाव्य उमेदवार आणि नेतेमंडळींकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांनी अमरावती (Amravati) लोकसभेवर आमचाच हक्क असल्याचा दावा केला आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे.
अमरावती लोकसभेवर आमचाच हक्क आहे. आमच्याकडे त्याकरिता सक्षम उमेदवार देखील आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात आम्ही अमरावतीच्या जागेसाठी शंभर टक्के मागणी करू. राहुल गांधी यांनी कायम देशातील युवा वर्ग आणि महिलांनी देशाचे नेतृत्व करावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. युवा आणि महिला देशाच्या राजकारणात सक्रिय असायला पाहिजे. ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील युवा आणि महिलांना उमेदवारी देण्याचा राहुल गांधी यांचा मानस असणार आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेनंतर आता भारत न्याय यात्रा सुरू झाली आहे. देशात बिलकिस बानो, महिला पहलवान यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू राहील. मोदींनी निवडणुकांच्या तोंडावर महिला आरक्षणावर विषयी खोटं आश्वासन देऊन मतदान घेतलं. त्यानंतर ते दहा वर्ष झोपून राहिले आणि आता त्यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा काढला आहे. मात्र देशातल्या महिला मूर्ख नाहीत. त्यांना आरक्षण द्यायचंच होतं तर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये का दिलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत संध्या सव्वालाखे यांनी पंतप्रधान मोदीवर टीका केली आहे.
…त्यांना लाज वाटली पाहिजे
आम्ही जेव्हा आंदोलन करतो, तेव्हा आमच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करतात, यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही चार महिला जेव्हा जातो तेव्हा हे निर्ढावलेले लोक बाहेर सुद्धा निघत नाहीत. मात्र आता चार नाही तर चार हजार महिला जातील आणि कमिशनर असो किंवा कोणी मोठे पोलीस अधिकारी, यांना बाहेर यावच लागेल. आम्ही महिलांचा न्याय आणि सन्मानासाठी लढत राहणार आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक जण आपापला दावा करणारच आहे. त्यावर मला फार काही बोलायचे नाही. काही लोकांबद्दल आम्हाला अजिबात बोलायचेच नाही. जे लोक दलबदलू आहेत. आमच्या महिलांचे मतदान घेऊन निवडून आले आणि त्यानंतर ज्यांनी आपली भूमिका बदलली. अशा लोकांवर बोलणे आम्हाला योग्य वाटत नाही, असा टोला संध्या सव्वालाखे यांनी खासदार नवनीत राणा यांचे नाव न घेता लगावला.
संबंधित बातमी
अधिक पाहा..