अमोल मिटकरी बनलेत ‘गृहमंत्री’ :
अमोल मिटकरी… राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीची तोफ… अजित पवारांचा ‘फायरब्रँड’ नेता… कधीकाळी राज्यात शिवव्याख्याते अशी ओळख असलेल्या अमोल मिटकरींना मे 2020 मध्ये अजितदादांनी रातोरात विधानपरिषदेचा आमदार करीत खळबळ उडवून दिली होती. अमोल मिटकरींना लागलेल्या आमदारकीच्या ‘लॉटरी’ने भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून सोडलं होतं. त्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी सभागृहात, सभागृहाबाहेर, सभेच्या फडात अन् टीव्हीवरील चर्चेच आपल्या वक्तृत्वाची मोहोर उमटवली. महाविकास आघाडी अन नंतरच्या महायुतीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत मिटकरींचं नाव चर्चेत यायला लागलं. 2024 मध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर त्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही चर्चेत आलं. मात्र, आमदार मिटकरी इतर संभाव्य दावेंदारांसारखे ‘वेटींग’वरच राहिलेत. मात्र, आज अमोल मिटकरींचं नशीब फळफळलंय. अन त्यांना थेट राज्याचं गृहमंत्रीपद मिळालं आहे. मात्र, ही ‘भूमिका’ राजकारणाच्या ‘रियल लाईफ’मधली नाही. तर ही भूमिका आहेय चित्रपटाच्या ‘रिल लाईफ’मधली. अमोल मिटकरी लवकरच ‘बिल्लोरी’ या मराठी चित्रपटात राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांनी भूमिका साकारत आहेत
‘रियल लाईफ’मध्येही प्रत्यक्षात गृहमंत्री व्हायला आवडेल : आमदार अमोल मिटकरी
‘रियल लाईफ’ मध्ये नसलं तरी ‘रिल लाईफ’मधल्या या औटघटकेच्या गृहमंत्रीपदाच्या भूमिकेनं आमदार मिटकरींना आनंद झाला आहे. गाड्यांचा ताफा, पोलिसांचा कडक सॅल्युट असा मंत्रिपदाचा सर्व तामझाम त्यांना चित्रीकरणादरन्यान काही काळ सुखावून गेला. या चित्रपटाचं शुटींग मार्च 2024 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालं. अकोल्यातील ‘श्री.शिवाजी महाविद्यालयात वर्षभरापूर्वी हे शुटींग पार पडलं. आता हा चित्रपट बनून तयार आहे. नुकताच या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम अकोल्यात पार पडला. खऱ्या आयुष्यातही त्यांना गृहमंत्री बनायला आवडेल, असं आमदार अमोल मिटकरी ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणालेत. मात्र, आपल्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजितदादांनी आमदार केलं हेच आपल्यासाठी त्यांचे कधीच न फिटणारे उपकार असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले.
हेही वाचा
Video: वो आये मेरी मजार पर… आधी आमदाराची फडणवीसांसाठी शायरी, मुख्यमंत्र्यांचाही शायराना अंदाज
अधिक पाहा..