मुंबई : आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच दौरे आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्रच आहे. मात्र, राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि इतर लहान पक्ष, संघटना, अपक्ष आमदार एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महायुतीमधील अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच, आता आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी देखील या चर्चांना खतपाणी घालण्याचं काम केलंय. आमदारांना सर्वप्रथम निवडून येणं महत्वाचं आहे. त्यामुळे, ते आमदार अजित पवारांची साथ सोडतील, असे भाकीतच बच्चू कडू यांनी केलंय.
अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. शेवटी आमदाराला मतदारसंघात निवडून यायचं असते, पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाच आहे. त्यामुळे, अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. लोकांना नाही पटलं अजित दादा अशी उडी घेणार म्हणून. कारण, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या विचारधारेमध्ये तफावत आहे, असं मत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या पक्षात नाराज असलेल्या आमदारांना आखणी बळ देण्याचं काम आमदार कडू यांच्या वक्तव्यातून होत असल्याचं दिसून येईल.
शरद पवारांचे दौरे सुरू
दरम्यान, एकीकडे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरू केला असून महिला भगिनींना आकर्षित करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून सरकारने महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलंय. त्यामुळे, विकासकामे आणि योजनांचा दाखला देत अजित पवार हे आमदारांना आपल्याकडे ठेऊन विधानसभेत उतरवणार आहेत. मात्र, काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, तर काही आमदारांना तिकीट कापले जाण्याची भीती असल्याने ते पर्याय शोधत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत पळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूर दौरा केल्यानंतर, पुन्हा कोल्हापूर दौऱ्यातही आपली, व पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय गणितं जुळवत ते विविध मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोट बांधत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे येण्यासाठी उमेदवारांची रांग आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारही दादांची साथ सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, अजित पवारांची साथ सोडण्यावरुन यापूर्वीच अजित पवारांनी, ज्या आमदारांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, असेही म्हटले होते. त्यामुळे, निवडणुकांची घोषणा होताच पुढील महिनाभरात याचे चित्र स्पष्ट होईल असेच दिसते.
हेही वाचा
अधिक पाहा..