Shiv Sena MLAs Disqualification  : आजच्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh)उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली. राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश करा, यासाठी भाजपनं कायद्यात बदल करावा असा टोला आमदार नितीन देशमुखांनी लगावला आहे. तसेच गाढवाने गाढवासारखा दिलेला निकाल असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकरांवर (Rahul Narwkar) टीका केली आहे. 

नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार असून त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर टीका केली. टीकेच्या ओघात त्यांनी राहुल नार्वेकरांना गाढव म्हटल्याने त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. 

नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, देशमुखांची मागणी

आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या आधीच आमदार नितीन देशमुखांनी त्यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की,  निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितलं तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल.  जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो कारण आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.

ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदेंचीच

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. 

उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केली. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. 

दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. आजच्या निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच कालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केला. दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

ही बातमी वाचा: 

 



Source link