मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशा असतानाही दारुण पराभवला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, याच बैठकीसंदर्भात बोलताना बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी ईव्हीएम संदर्भात भाष्य करत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमचा घोळ अनेक ठिकाणी आमच्या इथे सुद्धा पाहायला मिळाला. हा महायुतीचा विजय फक्त ईव्हीएम मशीन मुळेच झाला आहे. जर आपण घरात बसून शेतात पाणी देऊ शकतो, तर ईव्हीएम (EVM machine) मशीन कंट्रोल करणं काय अवघड आहे? असा प्रश्न करत त्यांनी विधानसभेच्या निकालाबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात सगळ्या ईव्हीएम गुजरातमधून आल्या होत्या, असेही ते म्हणाले.  

ईव्हीएम संदर्भात आमच्याकडे साडेचारशे तक्रारी – संजय राऊत

ईव्हीएम संदर्भात बोलताना  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत टीका केली आहे. ईव्हीएम बाबत आमच्याकडे जवळजवळ 450 तक्रारी आहेत. त्यावर वेळोवेळी आक्षेप घेऊन सुद्धा या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या, असं आपण कसं काय म्हणू शकतो? म्हणून माझी परत मागणी आहे की, हा निकाल तसाच ठेवून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  

ईव्हीएम बाबत झालेल्या घोळ बाबत उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक मध्ये एक उमेदवार आहे ज्याच्या घरात 65 मत असताना त्याला केवळ चार मतं पडली. डोंबिवलीत आमच्या कार्यकर्त्यांना असे आढळून आले की तिथे ईव्हीएम मशीनचे  आकडे मॅच होत नाहीत, आणि त्यावर आक्षेप घेतला तर निवडणूक आयोगचे अधिकारी तो आक्षेप मानायला तयार नाही. असे अनेक उदाहरणं पुढे आले आहेत. त्यांचे पुरावे ही पुढे आले आहेत. ज्यांनी कुठले असे क्रांतिकारी कार्य केले ज्यांना दीड दीड लाख मते मिळाली? काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले, असा काय पराक्रम यांनी केला, जे यांना यश आलं. म्हणून कुठेतरी शंकेला जागा आहे.  प्रथमच शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने ईव्हीएम वर संशय घेतली आहे. असेही खासदार संजय राऊत यांनी  शंका व्यक्त करत टीका केली

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link