अकोला: अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्याबाबत अजित पवार  गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जय मालोकार हे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. याबाबत राष्ट्रवादीच्या अकोला जिल्हाध्यक्षांसोबत जय मालोकर (Jay Malokar) यांचे बोलणे झाले होते. मात्र, जय मालोकार राष्ट्रवादीत जातोय याचा राग अकोल्यातील मनसेच्या (MNS) काही पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

जय मालोकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळेच त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या राड्यानंतर जय मालोकार यांच्यासोबत कोण होते? हे समोर आले तर या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक सत्य बाहेर येईल. अकोला पोलिसांनी या सगळ्या गोष्टींचा तपास करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी यांच्या या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा काहीवेळानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.

जय मालोकार राड्यात नव्हते, शांतपणे मागे उभे होते: अमोल मिटकरी

जय मालोकार काही दिवसांतच राष्ट्रवादी प्रवेश करणार होता. तो त्या राड्यात देखील सहभागी होता, पण त्याने काहीच केलं नाही मागे शांत होता. जय मालोकार याच्या मृत्यूला मनसेचा कर्नाबाळा दुनबळेच जबाबदार आहे. लवकर सर्व खुलासे उघड होतील अशी शक्यता मिटकरी यांनी वर्तवली. जय मालोकार यांची राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याची इच्छा होती. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सोबतही मालोकार यांचे बोलणे झाले होते, असे मिटकरी यांनी सांगितले.  

कर्णबाळा सुरुवातपासून पळपुटा होता. मिशीला पीळ देऊन मांड्या ठोकणारा आज मोबाईल बंद करून ठेवतोय. लवकरच त्याला गजाआड करू. अकोला पोलिसांचा शब्द होता. म्हणून कालच आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं सांगणं आहे की, मनसेच्या कार्यकर्त्यांचे लाड करु नका. असा पक्ष सोबत घेतलास जनता मतदान कसं करणार? महायुतीत सडके आंबे नको,त्यांना मोकाट सोडा, त्यांची औकात दिसून जाईल. जो धूर निघतोय रेल्वे इंजिनचा तोही जाईल. असा पक्ष सत्तेत सोबत असणे महायुतीची विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल, असेही मिटकरी यांनी म्हटले. 

आणखी वाचा

अमोल मिटकरी घासलेट चोर, पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार; अमेय खोपकर यांचा इशारा

अधिक पाहा..



Source link