अकोला: धर्माचे भांडवल करुन घडवण्यात येणाऱ्या दंगलींमध्ये फक्त गरिबांच्या पोरांचा बळी जातो. या दंगलीत कधीही श्रीमंतांची पोरं आतमध्ये जात नाहीत. त्यामुळे दंगलीच्या (Riots in Maharashtra) भानगडीत पडू नका, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar maharaj) यांनी केले. अकोल्यात नुकतेच त्यांचे कीर्तन (Kirtan) झाले. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी दंगल आणि धर्माच्या मुद्द्यावरुन मांडलेले सडेतोड विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेत्यांनी त्यांच्या कीर्तनांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर धर्माच्या नावावर दंगली घडवू पहात तरुणाईचा वापर करू पाहणाऱ्या नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. 

इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात म्हटले की, दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर हसायच्या गोष्टी नाहीत, 10 वर्षांची शिक्षा आहे. दंगलीत आतापर्यंत गरीब आत गेले, मोठ्याचे आत गेले नाही, कधी जाणारही नाहीत. हे मी तुम्हाला तळमळीने का सांगतो, कारण मी तुमचा आहे. एखादा म्हणेल तुम्हाला हिंदू धर्माचा अभिमान नाही का? पण मी त्यांना सांगेन की, तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करु नका. गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असे इंदोरीकर महाराजांनी ठणकावून सांगितले.

आयुष्यभर पोरांना भोंगे बांधायला वापरणारेच आता रोजगार मेळावे घेत आहेत; इंदोरीकर महाराजांची टीका

आपल्या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी राजकारण्यांना टोले लगावले. त्यांनी म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतलीत, तेच आज युवकांना नोकरीचं मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळावे घेत आहेत. नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्यात?, असा सवाल त्यांनी विचारला. आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचेच आहेत. ‘मी’ मेलो तरी तुम्ही सुधारणार नाहीये. आहे तोपर्यंत बदल होणार नाहीये. पण आपण गेल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल. एखादा म्हणेल तुम्हाला धर्माचं ईमान नाहीये, मात्र तुमचा धर्म माईकवर आहे आणि आमचा हृदयात आहे. तुम्ही स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका.  धर्म म्हणून आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटले. तसेच  आपण कोणतीच बँक लुटली नाही तरी आपल्याभोवती 90 लफडी आहेत, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांविषयी खंत व्यक्त केली.

गणेश विसर्जनाच्यावेळी भिवंडी आणि बुलढाण्यात तणाव

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या दिवशी  मुंबईतील भिंवडी (Bhiwandi)  आणि बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये (Buldhana Jalgaon Jamod)  विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे भिवंडी, बुलढाणा आणि जळगावात काहीसे तणावाचे वातावरण होते. भिवंडीत दगडफेक झाल्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला होता.

VIDEO: इंदोरीकर महाराज धार्मिक दंगलींबाबत नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा

भिवंडी आणि जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, बुलढाण्यात मूर्तीचे विसर्जन थांबवले

अधिक पाहा..



Source link