अकोला: आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या (Jalna OBC Melava) ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला. 

आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आंबेडकरांनी आजच्या अंबडमधील ओबीसी एल्गार सभेवर टीका केली. या सभेत बोलताना युवानेते सुजात आंबेडकरांनी आरक्षणासोबतच शेतमालाला भाव आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं म्हटलंय. 

भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? 

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. 

जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. 

भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका 

जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा, आजही खातो. पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले. 

जालन्यात ओबीसी महाएल्गार सभा

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांची जाहीर सभा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना इतर ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. जालन्यातील सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर जरांगे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.

ही बातमी वाचा: Source link