मुंबई : धनगर समाजाचा (Dhangar Reservation) अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर (Pandharpur) येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. अजूनही शासनाकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने आज राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. 

परळीत धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको

परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रस्ता रोकोमुळे काही काळ परळी-बीड आणि परळी-परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे, या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला. 

नाशिकमध्ये धनगर समाजाचे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमध्ये धनगर समाजाकडून नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काहीकाळ नाशिकपुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. आंदोलनादरम्यान धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले. 

पंढरपुरात शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको

पंढरपूर येथील कराड रोडवर धनगर बांधवांनी शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोकोला सुरुवात केल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खिलारे कुटुंबाला दिलेले धनगड म्हणून दाखले आजच्या आज रद्द करावे व तातडीने राज्यात धनगड व धनगर एकच आहे, असा जीआर काढावा अन्यथा धनगर समाज उग्र आंदोलन करेल, असा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला आहे .

अकोल्यातही रास्ता रोको 

अकोला जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा गावाजवळ धनगर समाजाचा रास्तारोको सुरू आहे. या आंदोलनात धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेय. धनगर समाजाच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली आहे. धनगर समाजाच्यावतीने मेंढरांना घेवून रस्ता रोको आंदोलन सुरु आहेय. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल आहेत.

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये बंद

तर जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्या टप्प्याचे उपोषण सुरू केल्यानंतर आज नांदेडमध्ये सकल मराठा समाजाने बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले आस्थापने बंद ठेवण्यात आलेली आहे. सकाळी आयटीआय चौकातून सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा हा कलेक्टर ऑफिसपर्यंत काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मनोज जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. नांदेड शहरसह 16 तालुक्यात बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केलेले आहे. या बंदसाठी आज पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. स्कूलबस असोसिएशनकडून देखील आज बंद पुकारण्यात आलेला आहे. 

लातूरमध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील खाजगी स्थापना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, बाजारपेठा, दळणवळण कडकडीत बंद करत व्यापाऱ्याने देखील सकाळपासूनच उस्फूर्तच प्रतिसाद दिला आहे. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून आंदोलन देखील करण्यात येणार आहे. लातूर शहर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर या भागातील बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

आणखी वाचा 

Dhangar Reservation: राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर 65 आमदार राजीनामा देतील, अजितदादा गटातील नेत्याचा निर्वाणीचा इशारा

अधिक पाहा..



Source link