अकोला : नागपूरनंतर आज अकोल्यातही (Akola) आज काँग्रेसमध्ये (Congress) राडा पहायला मिळाला. पीकविम्यासंदर्भात काँग्रेसने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर फोटो काढण्यावरून काँग्रेसच्या दोन जेष्ठ नेत्यांमध्ये ‘हमरी-तुमरी’ झाली. प्रदेश सचिव डॉ. अभय पाटील (Dr Abhay Patil) आणि दुसरे प्रदेश सचिव मदन भरगड (Madan Bharagad) एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत. डॉ. अभय पाटील काँग्रेसचे लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक आहेत. तर मदन भरगड अकोल्याचे माजी महापौर आहेत. अकोला काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलेलाच असतांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकरांनी काहीच झालं नसल्याचं म्हटलं. तर मदन भरगडांनी अभय पाटलांवर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, यावर ‘माझा’ने डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वाद झाल्याचं मान्य करीत भरगडांनीच वाद निर्माण केल्याचा दावा केला. तर मदन भरगडांनी डॉ. अभय पाटलांचं पक्षासाठी काहीच योगदान नसल्याचं म्हटलं आहे. 

पत्रकार परिषदेनंतर फोटो काढण्यावरून उफाळला वाद 

काँग्रेस अन वाद हे अतिशय घट्ट असं समीकरण असल्याचे म्हटले जाते. याच पक्षांतर्गत वाद आणि भांडणातून देश आणि राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली. अकोला जिल्ह्यात तीस वर्षांपासून काँग्रेस अंतर्गत भांडणामुळे अक्षरश: नेस्तनाबूत झाली. मात्र, यानंतरही अकोल्यात काँग्रेस यातून काही धडा शिकण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे. आज अकोल्यात झालेल्या एका वादानं अकोल्यातील काँग्रेसमधला कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. हा वाद होताय माजी महापौर मदन भरगड आणि अभय पाटिल यांच्यातील. माजी मंत्री अजहर हुसेन  यांच्या समोरच हा वाद झाला आहे. या वादात एकमेकांना पाहून घेण्याची भाषा झाली. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार कक्षात हा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर डॉ. अभय पाटील रागाने सभागृहाबाहेर गेलेत. आपल्या गाडीकडे गेलेल्या डॉ. पाटील आणि नंतर गाडीकडे आलेल्या भरगड यांच्यात परत एकदा वाद झाला. 
 

वादात रिव्हॉल्वर काढण्याच्या अफवांना ऊत 

डॉ. पाटील आणि भरगड यांच्यातील वाद इतका टोकावर गेला की चक्क अभय पाटील रागाच्या भरात कक्षाच्या बाहेर पडले. तिथे गाडीजवळ भरगड आल्यानंतर परत वाद पेटला. यादरम्यान डॉ. पाटील यांनी भरगड़ यांच्यावर ‘रिव्हॉल्वर’ ताणल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, डॉ. अभय पाटील यांच्याशी यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने संपर्क केला असता त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे फेटाळून लावली. तर मदन भरगडांनी डॉ. पाटील हे रिव्हॉल्वर आणण्यासाठीच बाहेर आल्याचा आरोप केला. 

अकोला आज पिक विम्यासह विविध विषयांवरून काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषेद अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज चार वाजताच्या सुमारास आयोजित होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपापली जागा राखून ठेवत खुर्चीवर बसले होते. आणि पत्रकार परिषद सुरू झाली. ही पत्र परिषद सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात काँग्रेसचेच पदाधिकारी अभय पाटील येथे दाखल झाले. 

… अन् असा झाला वाद 

भरगड म्हणाले, ‘मी’ पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच खुर्चीवर समोरच्या बसलो होतो. पत्रकार परिषद सुरू होताच काही क्षणात तेथे अभय पाटील आणि मला म्हणाले की आपण इथून उठा मला बसायचं आहे, त्यावेळी मी त्यांना एवढेच म्हणालो की मी पक्षात सीनियर आहे, आणि माजी महापौर देखील राहिलो आहे, त्यामुळे आपण ज्युनिअर असल्यामुळे मागे बसावं आणि ते पाठीमागे बसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी माझ्याशी खुर्चीवर बसण्यावरुन वाद घातला, ते मला रागाच्या भरात म्हणाले की ‘मी’ इथून बाहेर जातो, मी जा म्हटलं. आणि ते निघून गेले. येथूनच या वादाची सुरूवात झाली. 

मागच्या बैठकीतील विषय वादाचं मुळ कारण? 

मागील बैठकीत काँग्रेसच्या अकोला लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नावे समोर ठेवली. या बैठकीत काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड़ यांनी ज्या लोकांनी पक्षासाठी मागील पाच वर्षात काय केलंय? पक्षासाठी कोणते आंदोलन केले? कोणते काम केलंय? याची पार्श्वभूमी तपासणी यावी? त्यानंतर त्यांनाच नियमाप्रमाणे उमेदवार घोषित करावे, म्हणजेच उमेदवारी द्यावी, अशी मागणी घातली. काँग्रेसचे अभय पाटील यांनी देखील आपलं नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते, त्यातूनच त्याचाही रोष अभय पाटिल यांच्या मनात असू शकतो, असा दावा खुद्द भरगड यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे अभय पाटील हे पाच वर्षात कोणत्याच बैठकीत हजर राहत नव्हते, आता उमेदवारीला माझा स्पष्टच विरोध  असणार असल्याचे ते म्हणाले.

“मी रिव्हॉल्वर काढलेच नाही!” : डॉ. अभय पाटील

यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. पत्रकार परिषद संपल्यानंतर एक पत्रकार माझ्याजवळ आला आणि म्हणाला आपण सर्वांचा ग्रुप फोटो हवा. त्यासाठी मी ग्रुपमध्ये उभा राहलो. त्यावेळी बाजूला भरभर देखील उभे होते, ते म्हणाले तुम्ही बाहेर जा, मी बाजूला हटलो, इथे बाहेर नाहीये गेटच्या बाहेर जा. असे म्हणाले. त्यानंतर थोडा शाब्दिक वाद झाला, आणि बाहेर पडलो. पत्रकार दिनेश शुक्ला यांनी मध्यस्थी करत मला गाडीत बसवले आणि आपण शांत रहा आणि मी तिथून शांततेत निघालो. तसं पाहिलं तर माझ्याकडे ‘लायसन्ड रिव्हॉल्व्हर’ आहे, पण अशा प्रकारचे कोणतेही रिव्हॉल्व्हर काढण्याची धमकी मी दिली नाही. रिव्हॉल्व्हर माझ्याकड़ं असल्याने असा आरोप लावल्या जात असावा, असं डॉ. पाटिल ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणालेत. 

कोण आहेत डॉ. अभय पाटील? :

–  विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ. 
– वडील डॉ. के. एस. पाटील विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ होते. डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते. 
– डॉ. अभय पाटील सध्या प्रदेश काँग्रेसचे सचिव. 
– डॉ. पाटील अकोला लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार. 
– मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक. 

कोण आहेत मदन भरगड? :

– सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि अकोल्याचे माजी महापौर. 
– 2019 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे वंचितच्या तिकीटावर अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. 18 हजार मतं घेत झाला पराभव. मात्र, काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाला ठरले कारणीभूत. 

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर म्हणतात “काहीच झाले नाही!”.

या वादानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी असं काहीच झालं नसल्याचं पत्रकारांना सांगितलं. पक्षात सारं आलबेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. Source link