अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावतीमधील वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, यावरुन खल सुरु असताना अजित पवार यांनी एक वेगळीच चाल खेळली आहे. अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून (Varud Morshi Vidhansabha) निवडणूक लढण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार होते. मात्र, त्यांनी अलीकडेच अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन वेगळीच चाल खेळली आहे.

देवेंद्र भुयार हे वरुड-मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, यंदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा भाजपच्या उमेश यावलकर यांच्यासाठी सोडावी, असा आग्रह धरला होता.  काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेश यावलकर यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते.  त्यामुळे महायुतीत ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार, याचा फैसला अद्याप होऊ शकला नव्हता. तरीही अजित पवार यांनी आपल्याला एबी फॉर्म दिल्याची माहिती देवेंद्र भुयार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आता आपण काहीवेळातच उमेदवारी अर्ज भरु, असे देवेंद्र भुयार यांनी सांगितले. त्यामुळे आता वरुड-मोर्शी मतदारसंघावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडणार की या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पण भुयारांना अखेर एबी फॉर्म मिळालाच

देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवारी याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ‘उमेदवारी अर्ज भरायला चला’, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजितदादा गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.

आणखी वाचा

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला

अधिक पाहा..



Source link