Akola News: अकोला : मराठवाड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेला (Shiv Sena) वंचितनं मोठा धक्का दिला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी. डी. चव्हाणांनी (Dr. B.D. Chavan) ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) यशवंत भवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला.

डॉ. चव्हाण राज्य सरकारच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने आंबेडकरांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाच्या मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच अकोला (Akola News) जिल्ह्यातील ठाकरे गटाचे मुर्तिजापूर तालूकाप्रमुख संगीत कांबे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला आहे. संगीत कांबे यांच्या पत्नी गायत्री कांबे पंधरा वर्षांपासून ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्याचे राजकारणात मोठे फेरबदल होत असतांना मराठवाडा विदर्भाच्या राजकारणात देखील मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

मराठवाड्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे बंजारा समाजातील मोठे नेते डॉ. बी.डी चव्हाण यांचा आज वंचित मध्ये प्रवेश झाला. आज सकाळी अकरा वाजता अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यासह 300 प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. चव्हाण हे 2009 पासून हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. तब्बल तीन वेळा चव्हाण यांची लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली. चव्हाण हे वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. वंचितकडून उमेदवारीही निश्चित असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट झालं नाहीये.

चव्हाण यांनी 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती. नंतर 2009 साली त्यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढवली, तर 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला होता. चव्हाण यांच्या पत्नी डॉ. निकिता चव्हाण या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक आहेत. त्याही काही दिवसातच प्रा. अंजली आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान आता नांदेड आणि हिंगोलीत ओबीसीचे बडे नेते उबाठा गटासाठी महत्वाचे होते. आता हे दोन्ही नेते वंचितकडे गेल्यानं वंचित साठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये बळ मिळणार, असेही बोलले जाते

कोण आहेत डॉ. बी.डी. चव्हाण? 

  • मराठवाड्यातील बंजारा समाजाचे मोठे नेते.
  • सर्वात आधी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बहूजन महासंघातून राजकीय सुरूवात.
  • भारिप, बसपा, ठाकरे गट असा राजकीय प्रवास.
  • मराठवाड्यासह विदर्भातील ‘बंजारा बेल्ट’मध्ये चांगला प्रभाव.
  • 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती.
  • 2009 साली त्यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढवली, # 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला.
  • चव्हाण यांच्या पत्नी डॉ.निकिता चव्हाण या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक. 

अकोल्यातही ठाकरेंना धक्का; संगीत कांबे ‘वंचित’मध्ये 

अकोला जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संगीत कांबे यांचाही असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित मध्ये प्रवेश झाला आहे. कांबे हे 20 वर्षापासून राजकरणात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख आणि सुरुवातीला भाजपमध्ये होते त्यानंतर ठाकरे गटात प्रवेश केला. कांबे यांच्या पत्नी गायत्री कांबे 15 वर्षापासून मुर्तिजापूर तालुक्यातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देखमुख यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा आज मुर्तिजापूर तालूक्यात असतांना वंचितनं ठाकरे गटाला हा धक्का दिल्याचं बोलले जात आहे.  

‘महाविकास आघाडी’ने आपल्या मसुद्याचं काय केलं माहीत नाही : प्रकाश आंबेडकर

दरम्यान, किमान समान कार्यक्रमासाठी आपण दिलेल्या मसुद्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काय चर्चा केली?, याची आपल्याला माहिती नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. यासोबतच याला ते विलंब का लावतायेत?, याचे उत्तरही त्यांच्याकडेच असल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं आहे. आपल्या पक्षाची सर्व 48 जागा लढण्याची तयारी असल्याचं आंबेडकर म्हणालेत. मात्र, आपण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची वाट पाहणार असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link