अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच अमरावती (Amravati)  जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठा दावा केला आहे. “राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) झाल्यावर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील. त्यामुळे भाजपच्या (BJP) विरोधात एकच पक्ष राज्यात उरणार असल्याचा दावा,” रवी राणा यांनी केला आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना रवी राणा म्हणाले की, “ज्या पद्धतीने संपूर्ण देश, ज्या भावनेने राम मंदिर कधी बनणार, पत्र्याच्या शेडमध्ये असलेले राम लल्ला भव्य राम मंदिरात कधी विराजमान होणार याची आतुरता होती. अनेक विरोधी पक्षांनी राजकारण केलं. ‘राम मंदिर हम बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ असे होते. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बनवलं सुद्धा आणि तारीख देखील सांगितली. 22 तारखेला देशाचं आस्थेचं स्थान, श्रद्धा स्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती बदलणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष आहेत, त्यातील दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदींच्या सोबत असल्याचे पाहायला मिळतील,” असे राणा म्हणाले. 

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय बदल

पुढे बोलतांना रवी राणा म्हणाले की,”देशातील अनेक जे पक्ष एकत्र झाले आहेत. ते सर्वजण संभ्रमात आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या सर्व पक्षांचा संभ्रम दूर होणार आहे. त्यानंतर देशातील अनेक पक्ष मोदी यांना पाठिंबा देतील. महाराष्ट्रातील देखील महाविकास आघाडीमधील दोन पक्ष जेव्हा मोदींना जुळतील, तेव्हा महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात एकच पक्ष राहणार आहे. आणि हा पक्ष कोणता आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय बदल आपल्याला पाहायला मिळतील,” असेही राणा म्हणाले. 

राणा दाम्पत्य नेहमीच चर्चेत…

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असल्याचे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे दोनही पती-पत्नी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं रवी राणा आणि नवनीत यांनी जाहीर केलं होतं. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, महत्वाच्या विषयाकडे वेधलं लक्षSource link