अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.

‘मी म्हणजे ठाणे असं काहींना वाटतं, पण नाही. ठाणे म्हणजे असली शिवसेना, कारण मार्केटमध्ये चायनीज मालही येतो. बनावट चायनिज बोगस गद्दारांना वाटतंय ते खरी शिवसेना आहेत. शिवसेनेपेक्षा कुणी वर जाऊ शकत नाही, तुम्हाला वाटत असेल तर इतके वर जाल की परत येऊ शकणार नाही. हा जोश पाहून काहींचा होश उडाला आहे. ज्या सरकारचा जन्मच खोक्यांमधून झाला ते काय न्याय देणार?’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘हॉलमधील गर्दी पाहून अनेकांना चक्कर येईल. जे प्रश्न विचारतील त्यांना तुम्ही उत्तर भारतीयच उत्तर देतील. कोरोना काळात मला जे करायचं आहे ते मी केलं. राज्यातील जनता मला परिवारातील एक सदस्य मानतात. माझ्या कुटुंबाचं संरक्षण मीच करणार, महाराष्ट्र माझा परिवार आहे,’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा जन्माला आला नाही,’ असं प्रत्युत्तरही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयानंतर अनेक जण घराबाहेर पडले, त्यांच्या गळ्यातील पट्टेही निघाले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link