अकोला :  माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर  (Meera Borwankar) यांचा बोलविता धनी हा शरद पवार गटातील नेता असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केलाय. बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं असा इशारा अमोल मिटकरींनी बोरवणकरांना दिलाय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होतेय. 

अमोल मिटकरी म्हणाले,  मीरा बोरवणकरांचे आरोप बिनबुडाचे आहेत. बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावे.  बोरवणकरांनी आपलं भंगार पुस्तक विकलं जावं यासाठी असे आरोप केलेत. याचा बोलविता धनी कोण?. ज्याला आमच्याकडे यायचं होतं. परंतु तिकडे राहून दाखवायचं होतं असा नेता आहे.  हा आरोप आमच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. घर का भेदी लंका ढाये असा प्रकार आहे.

बारामतीतील संभाव्य मुकाबल्यावर मिटकरींचे वक्तव्य

त्याग, श्रद्धा आणि समर्पण हे कायम भाजप कार्यकर्त्यांकडून शिकण्याचे गुण असल्याचे म्हणत मिटकरींनी भाजपची स्तुती केली आहे. बारामतीतील संभाव्य मुकाबल्यावर मिटकरींनी वक्तव्य केले आहे.  सुप्रिया सुळे यांना शरद पवारानंतर सर्वाधिक ताकद ही अजितदादांनी दिलीय. निवडणुकीत कुणी कुठे आणि कुणामागे उभं रहावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे मिटकरी म्हणाले. 

बाजारपेठेत पुस्तक येण्याअगोदर खळबळ

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातून अजित पवारांबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.  येरवडा कारागृहाशेजारची जागा खासगी बिल्डरला विकण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्याचा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे.  मॅडम कमिशनर: द एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ ऑफ अॅन इंडियन पोलीस चीफ पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं हे पुस्तक येत्या काही दिवसात बाजारपेठेत येणार आहे पण त्याआधीच या पुस्तकातल्या एका दाव्यामुळं खळबळ माजली आहे.  

मीरा बोरवणकरांचे अजितदादांवर आरोप?

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी पुन्हा जागा मिळणार नाही. शिवाय कार्यालयासाठी आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज आहे.  मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्यानं माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. या ३ एकर जागेवर पोलिसांचं कार्यालय होणार होतं. पण जिल्ह्याच्या दादा मंत्र्यांनी माझं न ऐकता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जमिनीचा व्यवहार पूर्ण केला



Source link