अमरावती/मुंबई : राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर अजित पवारांच्या आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे, शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांना समसमान मंत्रि‍पदाची संधी मिळाली. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही इच्छुक उमेदवारांना इतर आश्वासन देत थांबवण्यात आलं होतं. तर, शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल हा विश्वास होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दिसत नाही. त्याचा पार्श्वभूमीवर ज्या नेत्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. आता, त्यांना महामंडळ देऊन शांत केलं जात आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी (कॅबिनेट मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाने शासन आदेश जारी करत अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पदाचा शब्द दिला होता, असे स्वत: अडसूळ यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, आनंदराव अडसूळ यांना आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

सामाजिक न्यायाचे तत्व प्रभावीपणे राबविण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समाजांच्या मागण्यांच्या अनुषंगाने या समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय वगैरे सद्यस्थितीचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी येथील नमूद शासन निर्णय, सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, 1 मार्च 2005 अन्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता 1 अध्यक्ष व 4 अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे गठन करण्यात आले असून त्यांची नियुक्ती, त्यांचे वेतन आणि भत्ते व त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उक्त आयोग व शासन यांच्यात कामकाजाबाबत समन्वय साधण्यासाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. येथील नमूद शासन निर्णय, 2 डिसेंबर 2022 अन्वये महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगावरील अध्यक्ष व 2 सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. सबब, सद्य:स्थितीत आयोगावरील अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे, आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावर अध्यक्ष व 3 सदस्य यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगावर अध्यक्ष व 3 सदस्य पदांवर खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये, अध्यक्षपदी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाव पदनाम

1. आनंदराव अडसूळ, माजी खासदार – अध्यक्ष

2. धर्मपाल मेश्राम, नागपुर – उपाध्यक्ष तथा सदस्य सदस्य

3. गोरक्षक लोसाडे, पिंपरी, पुणे – सदस्य

4. श्रीमती वैदेही वाढाण,पालघर – सदस्य

शिंदे गटाच्या 4 नेत्यांना महामंडळ

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद, तर आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे सर्वजण शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामध्ये भाजप वा अजित पवारांच्या एकाही नेत्याला महामंडळपदी संधी मिळाली नसल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

कोल्हापुरी, लय भारी… वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल

Source link