Maharashtra Congress : राज्यभरात आज काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसने आज राज्यभरात  भाजप आणि महायुतीच्या सरकारचा विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. नागपूर, पुणे अकोला, अमरावती इत्यादीसह राज्यातील विविध शहरांमध्ये आज काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदवत आहे. या आंदोलनाला काँग्रेसने चिखल फेक आंदोलन असे नाव दिले आहे. नीटच्या परीक्षेसंदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याची  चौकशी व्हायला पाहिजे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.  तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपने देखील रस्त्यावर उतरून नाना पटोले यांचा निषेधार्थ मोर्चा काढला होता. त्यावेळी नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावत त्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले, असा आरोप करत  त्या कृत्याचा भाजपने निषेध केला होता. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस देखील भाजप विरोधात आक्रमक झाली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी  चिखल फेकावे असेच काम केलं आहे- विकास ठाकरे

नागपुरातील व्हेरायटी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून तीव्र निषेध नोंदवला. यावेळी मोठ्याप्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. काँग्रेसचे नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध करत आहेत.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी  चिखल फेकावे असेच काम केलं आहे. अशा शब्दात काँग्रेसचे नेते  विकास ठाकरे यांनी टीका केली आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. सध्याचे सरकार हे जनता विरोधी आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने या आंदोलनाला चिखलफेक आंदोलन असे नाव दिले असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केलंय 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज राज्यात चिखलफेक आंदोलन सुरु आहे. नाना पटोलेला, काँग्रेसला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपचे आंदोलन माझ्या विरोधात होते. भाजप शेतकऱ्याचा अपमान जाणूनबुजून करत आहे. एमएसपी सरकारने जाहीर केलीय. आज माझा मोदीजींना सवाल आहे, तुम्ही जी महागाई वाढवली त्यानुसार शेतकऱ्याने 1 रुपये खर्च केला तर त्याला चाराने पण वाचत नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसले. तर दुसरीकडे 2016 ला शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु अद्याप त्यावर काय झाले नाही. फुलेंच्या नावाने योजना काढली, पण अद्याप त्याचे 50 हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांना मदत करा आम्ही नेहमी म्हणालो. मात्र त्यावर काहीही झाले नाही. आमचे सरकार करणार होते पण करोना  काळ आला आणि नंतर हे खोके सरकार आले.  त्यामुळे 50 हजार मिळाले नाही. अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर  घणाघात केला आहे. 

अकोल्यात काँग्रेसचे ‘चिकल फेको’ आंदोलन

‘राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. असा आरोप काँग्रेसनं अकोल्यात चिखल फेको आंदोलनदरम्यान केलाय. सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आलाय. अकोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ‘चिकल फेको’ आंदोलन केलं आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसनं यावेळी केलाय.

आंदोलनाचे यवतमाळातही पडसाद 

महायुती सरकार विरोधात काँग्रेसकडून आज यवतमाळच्या बस स्थानक चौकात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी, दलीत, अल्पसंख्याक, महिला, युवक तसेच गरीब व सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे.  तसेच महाभ्रस्ट महायुती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकत्मक पोस्टरला चिखल फासून निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link