अकोला : राज्य सरकारकडून अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. दरम्यान, प्यारे खान यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला पोलिसांनी उर्दू शाळेचा संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत असल्याचाही गंभीर आरोप प्यारे खान यांनी केला. पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. उर्दू शाळेत होत असलेल्या या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
संस्थाचालकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अकोला दौऱ्यानंतर अकोला पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं. पातुर येथील काँग्रेस नेते आणि संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन सय्यद इस्माईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 75, 308 (2) आणि 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद कमरोद्दिन अध्यक्ष असलेल्या पातूरच्या किल्ला भाग प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळेला भेट दिली. खान यांच्या भेटीत शाळेतील अनेक महिला शिक्षकांनी कमरोद्दिन याच्या अत्याचाराचा पाढा वाचला. महिला शिक्षिकांचा मानसिक शारीरिक आणि लैंगिक छळ करण्याच्या अनेक तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला.
कमरोद्दीन याच्या संस्थेच्या जिल्ह्यात एकूण 22 उर्दू शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कमरोद्दीन शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांवर विविध अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
प्यारे खान यांचा आरोप काय?
– राज्यातील सरकारचे अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार.
– या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत आहे.
– राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत आहेत.
– पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार.
– निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरण्यात आला.
– या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही.
– राज्यात बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहादसारख्या मुद्दांपेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत. अशी भूमिका मांडणाऱ्यांची तक्रार करू.
– नितेश राणेंच्या विषयावर आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.
– मुस्लिमांविरुद्ध भूमिका सरकारची नाही आणि ते कुणीही सहन करणार नाही.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..