Akola News अकोला : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसेतला (MNS) वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) देखील गंभीर आरोप करत या प्रकरणात त्यांना गोवलंय. या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का?, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना केलाय.
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) याच्या दोन तासांच्या झालेल्या बैठकीत आपल्या विरोधात काही शिजलंय का? त्यामुळे त्या प्रकरणातला प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक होत नाहीये, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी एकदाही आपली साधी विचारपूस केली नसल्याची खंतही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलीय.
योगेश चिले हा खंडणीबहाद्दर- अमोल मिटकरी
दरम्यान, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेल्या आरोपांनाही मिटकरी यांनी उत्तर दिलंय. योगेश चिले हा खंडणीबहाद्दर आहे. पनवेल परिसरात चिलेंनी अनेक कंत्राटदारांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदारांकडून खंडण्या वसूल करत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. या संदर्भातील अनेक ठोस पुरावे आपल्याकडे असून लवकरच पनवेल येथे जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय.
मुख्यमंत्र्यांचं आरोपीला अभय?
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे अजूनही फरार असून त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय. अकोला पोलीस कर्णबाळाचा शोध का घेत नाही? असा सवाल मिटकरीं यावेळी उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतोय.
तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे का? हे देखील आता समोर आलं पाहिजे. एका आमदारावर हल्ला होतो, मुख्यमंत्री साधी विचारणा करत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं माझ्यावर प्रेम नाही अथवा कमी झालंय, असेही अमोल मिटकरीं म्हणाले. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या दोन तासाच्या बैठकीनंतर कुठेतरी या प्रकरणावर पाणी मुरल्या गेलंय, असा आरोपही त्यांनी केलाय.
हे ही वाचा
अधिक पाहा..