अमरावती : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवार 22 जानेवारीला राम मंदिरात (Ram Temple) प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्याने अयोध्यानगरीसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या हनुमान गढीवर  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वतीने 11 लाख लाडूंचा प्रसाद वितरित केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे 11 लाख लाडू मिळून त्याचा एक भला मोठा लाडू तयार केला जाणार आहे. ज्याची नोंद ही विश्वविक्रमात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या 10 दिवसांपासून हे लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे.

विश्वविक्रमी लाडूचे होणार वितरण 

अमरावतीच्या हनुमान गढीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 11 लाख लाडूंचा एक लाडू तयार करण्यात येत असून तो उद्या शहरातील भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. 

अयोध्येतील पवित्र जल, मातीचे होणार वितरण

अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा उद्या 22 जानेवारीला होणार आहे. हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्मिती झाली असताना ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट उंच हनुमंताची मूर्ती निर्वाधिन आहे, अशा अमरावतीच्या हनुमान गढीवर 11 लाख लांडूचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच पवित्र जलाच्या 51 हजार बॉटल आणि आयोध्येतील मंदिराची पवित्र मातीच्या 51 हजार पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. सोबतच संध्याकाळी या हनुमान गढीवर 51 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले. 

नाशिकमध्ये देखील 15 हजार मोतीचूर लाडूंचे वितरण  

22 जानेवारीला नाशकात नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे तब्बल 15 हजार साजूक तुपातील मोतीचूर लाडूंचे श्रीरामाचा प्रसाद म्हणून रविवार कारंजा परिसरात वाटप करण्यात येणार आहे. हे लाडू बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे लाडू तयार करण्यासाठी यासाठी 1 हजार 500 लिटर गाईचे तूप, 1 हजार 600 किलो बेसन पीठ, 2 क्विंटल साखर, 22 किलो ड्रायफ्रुटस आणि 1 किलो इलायची पावडरचा वापर करण्यात आला आहे. श्री राम नामाचा जप करत लाडू सध्या वळले जात आहेत.

 

अधिक पाहा..



Source link