अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही महिनेच राहिले असताना राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठका, सभांचे सत्र सुरु झालेले आहे, त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपले रणशिंग फुंकले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला स्वत: प्रकाश आंबेडकर संबोधित करणार असून या सभेला लोकशाही गौरव सभा असे नाव देण्यात आले आहे.
लोकशाही गौरव सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भात महत्त्वाचा मतदार संघ मानला जातो. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने प्रकाश आंबेडकर आपल्या परीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी आज 20 जानेवारीला अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर लोकशाही गौरव जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला जिल्ह्याभरातील वंचितचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून हजोरोंच्या संख्येने लोक या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी वंचितची मुंबई, लातूर, अहमदनगर, सातारा, बीड, अकोला, सांगली ,जळगाव आणि नागपूर येथे सभा झाली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आज या सभेतून शक्तीप्रदर्शन करत अमरावती लोकसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीवर काय म्हणाले आंबेडकर?
राज्यात सुरू असलेली ठेकेदारी पद्धत बंद व्हावी. मतांच्या ध्रुवीकरणाचा मी कधी विचार करत नाही, ज्या प्रश्नांसाठी लढतोय ते सोडवण्यासाठी संसदेत कसं पोहचायला हवे याकडे बघतो. इंडिया आघाडीतील बोलणी अद्याप पुढे सरकली नाही. वर्षभरापूर्वी जिथे होतो तिथेच थांबलेलं आहे. इंडिया आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया आघाडी’तील प्रवेशापासून आंबेडकर अजूनही दुरच
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे आंबेडकरांचा राज्यात ‘महाविकास आघाडी’ आणि देशपातळीवर ‘इंडिया आघाडी’त प्रवेश कधी होणार?. आंबेडकर यांचा पक्ष सध्या या दोन्ही आघाड्यांचा घटकपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष आहे. दोन्ही पक्षांनी 2023 मध्ये ‘शिवशक्ती-भिमशक्ती’चा नारा देत नव्या राजकीय मैत्रीची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी अनेकदा जोरदार प्रयत्नही केलेत. आता शरद पवारही या नव्या मैत्रीसाठी तयार झालेत. मात्र, काँग्रेसने अद्याप त्यांच्या हातात मैत्रीचा हात दिलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..