Akola News : ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. पण त्यांच्याकडूनच न्याय होत नसेल तर जावं तरी कुणाकडे? असा प्रश्न विचारण्याचे कारण ठरले आहे ते अकोला (Akola) शहरात उघडकीस आलेला एक खळबळजनक प्रकार. शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. या महिलेला दोन वर्षांची चिमुकली मुलगी आहे. पहिल्या दिवशी तर या महिलेला रात्री 2 वाजेपर्यंत ताटकळत पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं गेलं. इतकेचं नव्हे तर चार दिवस या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप (Crime) महिलेने केला आहे.
यादरम्यान तक्रारकर्त्या महिलेलाच तिच्यावर कारवाई करण्याचा धमक्या पोलिसांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टरच्या दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचाही आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतला. अखेर चार दिवसानंतर सिव्हील लाईन पोलिसांना तक्रारदार महिला आणि माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला आहे. मात्र, डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण उघडकीस येताच शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
महिलेसोबत नेमकं काय झालं?
अकोला शहरतल्या जठारपेठ भागात चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक हा डॉ. प्रविण अग्रवाल यांचा दवाखाना आहे. त्वचारोगावरील उपचारांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र, शहरातील एक घटस्फोटीत महिला त्यांच्याकडे उपचारासाठी गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. डॉक्टरांकडून याआधी तीनदा असा प्रकार झाल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, सामाजिक भितीमुळे तिने याची वाच्यता कुठे केली नाही. मात्र, चौथ्यांदाही या डॉक्टरने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यावर तिने यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. प्रविण अग्रवाल विरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह सायंकाळपासून ते रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवलं गेलं.
यासोबतच गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. हनुमान जयंतीच्या अनुषंगानं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दिवशीचा हा प्रकार होता. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. मात्र तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. पुढे आपल्यावरचं कारवाई करणार असल्याच्या धमक्या पोलिसांकडून मिळाल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. शेवटी आपली मुलगी रडत असल्याने खाली हात पोलीस ठाण्यातून घरी परतावं लागल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे.
महिलेनं पोलीस तक्रारीत सांगितली आपबिती
30 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता तक्रारदार महिला ही चेहऱ्यावरील आजार दाखवन्यासाठी जठारपेठ मधल्या प्रसिद्ध असलेल्या ‘चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक’ या डॉ. प्रविण अग्रवाल यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. यादरम्यान अग्रवाल यांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केला. याआधी त्याने या महिलेसोबत तीनदा असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दवाखान्यात मोठा गोंधळ उडाला. महिलेचा लहान भाऊ आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वादही झाला. अखेर महिलेनं ठाणं गाठलं.
मात्र, पहिल्या दिवशी तब्बल रात्री दोन वाजेपर्यंत तिला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याच. आरोप या महिलेनं केला आहे. पुढे दोन दिवस तिला रात्री 11 आणि 9.30 वाजेपर्यंत पोलिसांनी तिला ठाण्यात बसवून ठेवलं. तिच्या तक्रारीवर तब्बल चार दिवस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता असा आरोप तक्रारदार महीलेनं केला आहे. अखेर या महिलेच्या मूळ तक्रारीवर 4 दिवसांनंतर 3 मेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला 354 (A) नूसार आरोपी डॉक्टरविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला.
सिव्हील लाईन पोलिसांच्या बेजबाबदार वर्तनावर काय कारवाई होणार?
या संपूर्ण प्रकरणात सिव्हील लाईन पोलिसांची भूमिका अत्यंत बेजबाबदार आणि संशयास्पद आहे. आरोपी डॉक्टरला वाचविण्यासाठी पोलिसांच्या धडपडीचा ‘अर्थ’ काय?, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. यात पोलिसांची उत्तरे अत्यंत बेजबाबदारपणाची होती. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव हे माध्यमांशी बोलतांना म्हटले की, सदर महिलेच्या तक्रारीनंतर दवाखान्यातील CCTV फुटेज तपासले गेले.
त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिस अधिक्षकांकडे महिला पोलिस अधिकाऱ्याची मागणी केली आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकर गुन्हा दाखल होणार. पण विशेष म्हणजे एका महिलेला रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत पोलिस ठाण्यात बसवून ठेवल्या जातंय हे योग्य आहे का? असा सवाल पत्रकारांनी जाधव यांना विचारला असता, ते म्हटले महिलेला रात्री 7 वाजेनंतर अटक करता येत नाही. परंतु तक्रारदार महिला कितीही वेळ ठाण्यात थांबू शकते असे जाधव यांचे म्हणणे हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते.
झालेला प्रकार दुर्दैवी : डॉ. आशा मिरगे
या प्रकारावर ‘एबीपी माझा’शी बोलतांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला पोलिसांचं हे बेजबाबदार वागणं हे चिंताजनक आहे. एका लहान मुलाची आई असलेल्या पिडीत महिलेला रात्री उशिरापर्यंत बसवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. राज्य महिला आयोग आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. मिरगे यांनी केली आहे.
‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच कर्तव्य असतं. पण त्यांच्याकडून न्याय होत नसेल तर जावं तरी कुणाकडे?. या प्रकरणात आरोपी डॉक्टरवर ‘मेहेरनजर दाखविणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का? किंवा किमान त्यांची कानउघडणी तरी जिल्हा पोलीस अधीक्षक करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..