Amravati Crime News : सर्वेक्षणाच्या नावाखाली काही अज्ञातांनी अमरावतीच्या (Amravati News) नायब तहसीलदारांच्या घरात शिरत चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची खळबळजनक घटना घडली होती. 30 जानेवारीच्या भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केले असता अवघ्या 60 तासांत पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून देशी कट्टा, चाकू आणि चोरीला गेलेला एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्वेक्षणाच्या नावाखाली भरदिवसा दरोडा
अमरावती शहरातील राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या. दरम्यान काही अज्ञातांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली घरात शिरून विचारपूस सुरू केली. त्यानंतर त्यांनी महिलेकडे पिण्यास पाणी मागितले आणि अचानक त्यांनी चाकू आणि देशी कट्याचा धाक दाखवत महिलेच्या अंगावरील दाग दागिन्यांसह घरातील रक्कम असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
महिलेने प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे धावत आले असता, त्या महिलेने सर्व प्रकारची माहिती दिली. त्यानंतर जमलेल्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. भरदिवसा एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात अशी घटना घडणे ही पोलीस आणि प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईचे वेग वाढवत सखोल तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा छडा
अमरावती पोलिसांनी आठ पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात केली असता या परिसरात लागलेले जवळजवळ शंभर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही संशयित व्यक्ती आढळून आल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथक आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने या प्रकरणातील एका संशयित व्यक्तीला शहरातील रद्दीपुरा परिसरातून अटक केली.
या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले असून इतर चार संशयितांना देखील पकडण्यात आले आहे. यातील एक जण नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरात ड्रायव्हर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अनेक वर्ष अडसुळे यांच्या घरात काम केल्याने त्याला घरातील बऱ्यापैकी माहिती असल्याचे तपासातून समोर आले आहे.
दिपक रमेश इंगोले (40, रा. रद्दीपुरा), उमेश उत्तमराव गवई (35, रा. मोजखेडा पो. स्टे. चांदुर बाजार जि. अमरावती), विनोद छोटेलाल सोनेकर (37, रा. बडचितोलो तहीसील पांढरणा जि. छिंदवाडा) , महेंद्र विठोबा निरवाडे (40, रा. करजगांव ता. वरूड जि. अमरावती), पंकज रामप्रसाद यादव (34, रा. भानखेडा जि. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अधिक पाहा..