Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत (MVA) अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये, अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर  पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

आंबेडकर ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार?

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा तिढा अद्याप कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असतांना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची मोर्चे बांधणीला देखील सुरवात केली असून संभाव्य उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आंबेडकरांनी स्वत: अकोल्यात स्वत:ची उमेदवारी जाहीर केलीय. तर वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंके, सांगलीतून ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय.

याशिवाय आंबेडकरांचा दक्षिण-मध्य मुंबई, हिंगोली, रामटेक, लातूर या जागांवरही  दावा आहे. दोन दिवसांपूर्वी वंचितने मविआच्या बैठकीत राज्यातील 27 जागांचा प्रस्ताव दिला आहे. आज सकाळी आंबेडकरांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना परवानगीशिवाय मविआच्या कोणत्याही कार्यक्रम आणि बैठकांना जाऊ नये अशी तंबी दिलीये. त्यामुळे 2019 ची पुनरावृत्ती होत आंबेडकर ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार का?  अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वंचित महाविकास आघाडीसोबत आली तर आवडेल- शरद पवार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सहा आणि सात मार्चला मुंबई येथे बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत आली तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायला आवडेल, असे व्यक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा देण्याबाबत देखील निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या सोबत आला, तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याची तयारी देखील शरद पवार यांनी बोलतांना व्यक्त केलीय.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..Source link