Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट,  अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

MNS Activist Jay Malokar Death Case : अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. 

30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. 

मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कुटूंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे मालोकार कुटूंबियांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटले आहे. 



Source link