अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर येथे चांगलाच राडा झाला. अकोल्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कुंड्या व दगडाने अमोल मिटकरी यांच्या कारच्य काचा फोडल्या. त्यानंतर, आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे फिर्यादही राज ठाकरेंचं नाव घेण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता तीन आरोपींना न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला आहे.
अमोल मिटकरी आणि मनसेच्या राडा प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये मुख्य आरोपी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ भगत आणि दिपक बोडखे यांचा समावेश आहे. याप्रकरणी एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी, 3 आरोपींचा 24 तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहातील राडा प्रकरणी झाले होते 13 लोकांवर सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हे दाखल़. त्यातील आरोपींपैकी जय मालोकार यांचा काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आता, उर्वरीत 9 आरोपींनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद आणखी टोकाला गेला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांना माझं ओपन चॅलेज आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो अन् एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असं थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अमोल मिटकारींना दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर सुपारीबाज म्हणत टीका केली होती. यापूर्वीही त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे, मनसे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी थेट खळखट्याकचा अवलंब केल्याचं दिसून आलं.
त्यामुळे सुरू झाला वाद
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली.
हेही वाचा
अधिक पाहा..