Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर  काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.  

भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग केलं. त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. दबावतंत्र ही भाजपची रणनीती आहे, मात्र अफवांना बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असंही प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं. 

भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. अशोक चव्हाण हे भारदस्त नेता होते. पण, हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी  केला आहे. 

आमच्या राजीनाम्या बाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे. हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे. माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे कोणत्याही संस्था नाही त्यामुळे ईडीची भीती ते दाखवू शकत नाहीत. पण, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत त्यानुसार मला भाजपचे विचार पटत नाहीत असं स्पष्ट मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.  

इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही

इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही.  पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहे. काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे. भाजप केवळ आम्ही अन्स्टेबल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नेत्यांवरती प्रेशर आणून भाजपकडून सायकॉलॉजिकल गेम खेळला जात आहे. काँग्रेस हा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही. आम्हाला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप.  त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

 





Source link