महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. कोकणात पाऊस थोडा ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं कोल्हापूर-सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं शहरात पुराचे पाणी शिरले आहे. राज्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यासह घाट परिसरात मुसळधार पाऊस बरसू शकतो. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा घाट माथ्यासाठी देण्यात आला आहे. तर, सामान्य स्वरुपाचा पाऊस राज्यातील इतर जिल्ह्यांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर, साताऱ्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईत काय आहे पावसाचा स्थिती?

मुंबईत कालपासून पावसाने उसंत घेतली आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत राहणार आहे. 

या जिल्ह्यांना अलर्ट

रायगड – ऑरेंज
सिंधुदुर्ग – ऑरेंज 
रत्नागिरी – ऑरेंज 
ठाणे – यलो 
मुंबई – यलो 
पुणे – ऑरेंज 
सातारा – ऑरेंज 
चंद्रपूर – ऑरेंज 
गडचिरोली -ऑरेंज 
गोंदीया – ऑरेंज 
नागपूर – यलो 

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे.

पंढरपुरात नदीची पाणी पातळी वाढली

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर धरणातून सोडलेले पाणी आज मध्यरात्री पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे चंद्रभागा त्याच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याने वेढा टाकलेला आहे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने भाविकांना केलेला आहे.





Source link

पांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली



 एस टी वर पांडुरंगाची कृपा झाली. आषाढी यात्रेनिमित्त एस टी ने नियोजनपूर्वक केलेल्या फेऱ्या यशस्वी आल्या असून. 28 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे. 
 



Source link

Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?


Pune Rain Update : पुण्यात गुरूवारी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRF च्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर की नैसर्गिक आपत्ती असली तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये (Pune Rain Update) उडालेला हाहाकार त्याचच उदाहरण आहे. 

पुण्यात पावसाचा हाहा:कार

एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. तर पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचावकार्य करण्यात आलंय. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. 

मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुय. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल सुरू आहेत. महानगरपालिकेसमोरील काकासाहेब गाडगीळ पूलावरून पाणी वाहू लागलंय. या पुलावर एक कार अडकलीय. पाणी पुलावरून वाहू लागल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.

बावधन परिसरात एक शोरुम पाण्यात गेलंय. याठिकाणी सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येतंय. त्याप्रमाणे बावधनमध्ये सर्व्हिस रोडवरही पाणी आहे. पुरामुळे इंद्रायणीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेलेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा पूल 18 वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आळंदीचा पिंपरी-चिंचवड आणि पुण्याशी संपर्क तुटलाय.

राजकारण बाजूला ठेवा, सामान्य माणसाला मदत करा’. मुलं, ज्येष्ठ नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. खडकवासला धरणाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यानं ही परिस्थीती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फिल्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केलंय.

पुण्यातील लवासामध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेत 2 बंगले गाडले गेलेत. त्या बंगल्यांत 2 जण असल्याची माहिती समोर आलीय. NDRF पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. प्रत्येक पावसात पुणेकरांना या अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील नदी नाले ओढे यांच्यावर झालेलं अतिक्रमण याला जबाबदार असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र प्रशासन याकडे  गांभिर्याने पाहणार का? प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

पुण्यातील पावसाला जबाबदार कोण?

महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर प्रशासनाला जाग येते. यावेळी असंच घडलं. खडकवासल्यातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी – अधिक होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं होतं. असं असताना महापालिका आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अक्षरशः सुस्त होता. त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून काहीच केलं नाही. पोलीस यंत्रणादेखील सज्ज नव्हती असं म्हणावं लागेल.

पुण्यामध्ये 24 तासात सुमारे दीडशे मिलिमीटर पाऊस पडला. लोणावळ्यात चारशे मिलीमीटरच्या आसपास तर तामिनी घाटात पाचशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. मागील कित्येक वर्षात असा पाऊस पडला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत अपेक्षेपेक्षा जास्त किंवा हवामान अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्यानंतर आवश्यक खबरदारी घेतली गेली पाहिजे. पुण्यात ती घेतली गेली नाही हे स्पष्ट होतं. 

नदीला पूर आला की डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढया नाल्यांचं पाणी मागेच साचायला सुरुवात होते. त्यातच अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आले आहेत. त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. त्यातच पुण्यामध्ये ठीक ठिकाणी मेट्रो प्रकल्प तसेच उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून पाण्याचा योग्य मार्गानं निचरा होत नाही. शासन प्रशासन आणि नागरिक सगळेच त्याला जबाबदार आहेत. 





Source link

'76000 कोटी रुपये…'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर


Nirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांना अधिक निधी देण्यात आला. इतर राज्यांचा आणि खास करुन महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आला नाही असा आरोप विरोधकांनी केला. या आरोपाला राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिलं आहे. यावेळेस सीतारमण यांनी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यावर निशाणा साधला. 

काय आरोप करण्यात आले?

महाराष्ट्राचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेल्या भरघोस निधीवरुन कठोर शब्दांमध्ये टीका केलेली. “एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा,” असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. “देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे,” असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं?” असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्र्यांनी काय उत्तर दिलं?

प्रत्येक बजेटमध्ये देशातील प्रत्येक राज्याच्या नावाचा उल्लेख करणं शक्य होत नाही, असं निर्मता सीतारमण यांनी म्हटलं आहे. संसदेमध्ये त्यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राचा उल्लेख केला. “उदाहरण घ्यायचं झालं तर जून महिन्यामध्ये मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील वाधवान येथे बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 76 हजार कोटी रुपये निधी देण्यात आला. महाराष्ट्राचं नाव फेब्रुवारीत सादर केलेल्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये आणि काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येही घेण्यात आलं नाही. त्याचा अर्थ महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं असा होतो का?” असा सवाल निर्मला यांनी राज्यसभेमध्ये बोलताना उपस्थित केला.

मी काँग्रेसला आव्हान देते…

निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणामध्ये पश्चिम बंगालमधील योजनेचाही उल्लेख केला. “भाषणात एखाद्या विशिष्ट राज्याचे नाव नसेल, तर भारत सरकारच्या योजना आणि कार्यक्रम, जागतिक बँक, एडीबी आणि इतर अशा संस्थांकडून आपल्याला मिळणारी मदत या राज्यांमध्ये जात नाही, असा त्याचा अर्थ होतो का? ही मदत नियमितपणे जात असते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचा हा मुद्दाम प्रयत्न आहे की, आपल्या राज्यांना काहीही दिलेले नाही, असा आभास लोकांमध्ये निर्माण करायचा. हा आरोप अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी केलेल्या सर्व अर्थसंकल्पीय भाषणांकडे पाहून मी काँग्रेस पक्षाला आव्हान देते की – त्यांनी देशातील सर्व राज्यांची नावे त्यावेळी घेतली होती का? हे सांगावं,” असंही निर्माला यांनी म्हटलं आहे.





Source link

'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी…' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान


Manoj Jarange vs Prasad Lad : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मोठा निर्णय घेतलाय. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलंय. विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वत:च सोडायचा निर्णय़ घेतलाय. कुठलाही राजकीय नेता यावेळी येणार नाहीय. उपोषण स्थगित करुन दुसऱ्या कामाला लागण्याचा विचार असल्याचं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. केवळ सलाईन लावून अंतरवालीत पडून राहण्यात काही अर्थ नाही. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय. तसंच फडणवीसांनी अनेक राजकीय नेत्यांना अडचणीत आणलं. मराठे संपवून तुम्हाला मोठं व्हायचंय का असा सवालही त्यांनी केलाय. 

प्रवीण दरेकर यांच्यावर टीका
यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवरही (Pravin Darekar) निशाणा साधलाय. 5 ते 7 जणं भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा त्यांनी दिलाय.

भाजप नेते प्रसाद लाड यांचं आव्हान
मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याला भाजप नेते प्रसाद लाड (Parasad Lad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे बंधू मनोजदादा यांनी दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली, आज त्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यांना आमचे उमेदवार पाडायचं असतील तर त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, आम्हीही बघू कसे पाडता असं आव्हान लाड यांनी दिलंय. दरेकर मराठा आहेत का तुम्ही विचारता, आम्ही मराठे आहोत का याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नकोय. आम्ही तुमच्या सत्य परिस्थितीकर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराच प्रसाद लाड यांनी दिलाय.

फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? कोर्टत महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही हे मान्य आहे का? असे सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेत. तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही, त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही असं सांगत फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाही. पण हे तुम्ही सुरूच ठेवला तर आम्हालाही या भाषेत बोलावं लागेल असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिलाय.

मनोज जरांगे निजामशाहीकडे मोगलाईकडे जात आहेत, जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, त्यांना महिलांचं चालणारं घर बंद करायचं आहे का? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का?लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, दोन कोटी मराठ्यांना याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का ? असे प्रश्न प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना विचारले आहेत. जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याच्या वास येतोय असा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय.

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक  केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होतं. पण त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते.





Source link