अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पराभूत उमेदवार आणि पक्षातील नेत्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट हा निकालचा आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं,  तर काँग्रेसनेही ईव्हीएमबाबत (EVM) शंका उपस्थित केल्या आहेत. राज्यातील काही मतदारसंघात पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम व मतमोजणीवर संशय व्यक्त करत फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे. त्यातच, अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी देखील मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेत घोळ असल्याचं म्हटले आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गोंधळ घातला. 

विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात वंचितने सपाटून मार खाल्ला आहे. या पराभवानंतर आता पक्षातील वाद चव्हाट्यावर यायला लागले आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघातील वंचितच्या पराभवाची विचारणा करण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषद अध्यक्षांचा निवासस्थान गाठलं. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले आहेत. वंचितच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना अढाऊ यांच्या शिवाजीनगर या गावातच वंचितला फक्त 99 मतं मिळाली. शिवाजीनगर हे गाव अकोट मतदारसंघात येतंय. अकोट मतदार संघात वंचितचे दीपक बोडखे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत. शिवाजीनगर गावात बुथ क्रमांक 104 आणि 105 वर काँग्रेसला 951, भाजपला 475 तर वंचितला केवळ 99 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, याचा जाब विचारण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली. 

वंचितला येथील मतदान केंद्रावर फक्त 99 मतं मिळाल्यावरुन, कमी मतदानावरून वंचितचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना अढाऊ यांच्यात प्रचंड शाब्दिक वाद झाला. जिल्ह्यातील पराभवावरून वंचितमध्ये सध्या मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात वंचितमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, येथील मतदारसंघात केवळ 99 मतं कशी पडली याचं कारणही शोधण्याचा प्रयत्न वंचितकडून होत आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघात मतमोजणी व मतदान यामध्ये तफावत दिसत असल्याने पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत, त्याचे निरासन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, ईव्हीएममध्ये कुठलाही बिघाड नसल्याचंही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

अधिक पाहा..



Source link