Akola Politics News : 15 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या (Maharashtra Election) तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणानंतर महाराष्ट्रातील राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार आहे?, याबाबत उमेदवार आणि जनतेमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे.

अकोला जिल्ह्याच्या राजकारणातही सध्या अशीच संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहेत. यातील चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर एक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. यात बाळापुर आणि अकोला पूर्वच्या दोन विद्यमान आमदारांचं तिकीट सध्या ‘कन्फर्म’ समजलं जात आहे. अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी भाजपल नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. मात्र, अकोट आणि मुर्तीजापुर मतदारसंघात सध्याच्या आमदारांना तिकीट मिळणार की नाही?, याबद्दल मोठा संभ्रम आहे. तर इतर राजकीय पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे माजी आमदार नातीकोद्दीन खतीब यांना बाळापुरातून उतरवत जिल्ह्यातला आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. 

अकोला जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून सध्या उमेदवारीची आशा लावून बसलेले अनेक इच्छुक सध्या देव पाण्यात बुडवून बसले आहेत. लोकसभेत भाजपच्या विजयानंतर जिल्ह्यात भाजपच्या उत्साहात मोठी भर पडली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपला अकोट मुर्तीजापुर आणि अकोला पश्चिम मतदारसंघात आमदार विरोधी लाटेला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‌ जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कशी राजकीय परिस्थिती आहे.

2019 मधील विधानसभेतील पक्षीय बलाबल 

एकूण विधानसभा मतदारसंघ : 05

भाजप : 04
शिवसेना : 01

राजकीय उलथापालथीनंतर अकोला जिल्ह्यातील विधानसभेच सध्याचं राजकीय बलाबल

भाजप : 04
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : 01

मतदारसंघ, आमदार आणि पक्ष

1) अकोला पश्चिम   : गोवर्धन शर्मा (निधन)  : भाजप
2) अकोला पूर्व : रणधीर सावरकर : भाजप 
3) अकोट  : प्रकाश भारसाकळे : भाजप 
4) मुर्तिजापूर (राखीव : एससी) : हरिश पिंपळे : भाजप
5) बाळापूर : नितीन देशमुख : शिवसेना ठाकरे गट

1) अकोला पश्चिम : 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा मतदारसंघ आहे. पूर्णतः शहरी असलेल्या या मतदारसंघात 3 लाख 49 हजार 484 मतदार आहेय. गेल्या तीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळं आलीत. पण, या मतदारसंघावरील भाजपची मांड ना ढिली झाली ना खिळखिळी. तर प्रत्येक निवडणुकीत भाजपचे ‘कमळ’ येथे मोठ्या दिमाखात आणि ताकदीने उमलत गेले. याआधी या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. भाजपच्या या मतदारसंघातील ताकदीचे मर्म लपलेले आहे ते मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे. याच बळावर गोवर्धन शर्मा यांनी सलग सहावेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, 2023 मध्ये झालेल्या त्यांच्या निधनानंतर पक्ष नवा चेहरा या मतदारसंघासाठी शोधत आहे. 

1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होताय. मात्र, काँग्रेसच्या या गडाला अंतर्गत मतभेदांचा विळखा पडला अन हा मतदारसंघ अलगदच भाजपच्या ताब्यात गेलाय. संपूर्णतः शहरी असलेला हा मतदारसंघ आहेय. अकोला महापालिकेच्या 20 पैकी 12 प्रभागांचा या मतदारसंघात समावेश आहेय. लोकसभेत या मतदार संघातून काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीने या मतदारसंघावर आपलं लक्ष चांगलंच केंद्रीत केलं आहे.

भाजपमधून प्रमुख दावेदारांमध्ये अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल, ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदाणी, माजी महापौर अश्विनी हातवळणे, ज्येष्ठ वकील मोतीसिंह मोहता,  प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह इतर 25 जण शर्यतीत आहेत. 

तर काँग्रेसकडून महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, वंचितमधून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. रहेमान खान, माजी विरोधी पक्ष नेते डॉ. जिशान हुसेन आणि लोकसभेतील पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील शर्यतीत आहे.

वंचित बहूजन आघाडीकडून‌ निलेश देव, सिंधी समाजाचे नेते मनोहर पंजवाणी, सीमांत तायडे यांची नावं प्रामुख्याने शर्यतीत आहे. वंचित बहूजन आघाडी ऐनवेळी येथे इतर पक्षातील बंडखोरालाही आयात करून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर एमआयएम ऐनवेळी एखाद्या राजकीयदृष्ट्या ताकतवान मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवण्याचीही शक्यता आहे. 

अकोला पश्चिम मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते :

भाजपाचे गोवर्धन शर्मा 2593 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
गोवर्धन शर्मा            भाजप         73262
साजिदखान पठाण   काँग्रेस          70669
मदन भरगड             वंचित          20687
 
अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारसंख्या : 

स्त्री : 175322
पुरूष : 174138
तृतीयपंथी : 24
एकूण : 349484

2) अकोला पुर्व 

अकोला जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे अकोला पुर्व मतदारसंघ. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा असलेला हा मतदारसंघ आहेय. या मतदारसंघात अकोला महापालिकेचे 8 प्रभागासोबतच अकोला तालुक्याचा ग्रामीण भाग समाविष्ट आहेय. या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. पक्ष तिसऱ्यांदाही त्यांनाच निवडणूकीत उतरवणार असल्याचे स्पष्ट आहेय. तर महाविकास आघाडीत या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील गटनेते गोपाल दातकर, या मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार हरिदास भदे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख देवश्री ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस कडून पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे, राजेश मते आणि ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.

या मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉ. संतोष हुशे आणि डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची नावं चर्चेत आहेत.

अकोला पुर्व मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे रणधीर सावरकर 24,723 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
रणधीर सावरकर       भाजप         100475
हरिदास भदे              वंचित          75752
विवेक पारसकर         काँग्रेस         9533

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या : 

स्त्री : 173510
पुरूष : 180165
तृतीयपंथी : 15
एकूण : 353690

या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या 3 लाख 53 हजार 690 इतकी आहेय. 2014 मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं. गेल्या दहा वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड बसवलीय.  जिल्ह्याच्या राजकारणात धोत्रे गटाचे ‘चाणक्य’ म्हणून जिल्ह्यात रणधीर सावरकर यांची ओळख आहेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात भाजपला 27 हजार मतांची आघाडी मिळाली होतीय. या निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, खारपाणपट्ट्याचा प्रश्न, त्याबरोबरच मोठे उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी हे प्रश्न गाजण्याची शक्यता आहेय. सध्या जिल्हा आणि भाजपाच्या राजकारणावर आमदार रणधीर सावरकर यांची मोठी पकड आहे. त्यामुळे आमदार सावरकर यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक या मतदारसंघात मोठी ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यामूळे अकोला पूर्व मतदासंघातील निवडणुक निश्चितच ‘हाय होल्टेज’ असेल यात शंका नाही.

3) अकोट  

अकोट विधानसभा मतदारसंघ हा अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ. या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतोय. या मतदारसंघात तब्बल 3 लाख 10 हजार 88 मतदार आहेयेत.  अकोला जिल्ह्यातील ‘अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका ‘खास’ वैशिष्ट्यासाठी. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला ‘आमदार’ परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघानं 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीनं पाळला आहे. मात्र, 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. 

या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहेय. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 9168 हजार मतांची आघाडी आहे. 

अकोट मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
प्रकाश भारसाकळे      भाजप       48586
संतोष रहाटे                वंचित        41326
अनिल गावंडे              अपक्ष         28183

अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :

स्त्री : 149214
पुरूष : 160873
तृतीयपंथी :01
एकूण : 310088

येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याबद्दल मोठी साशंकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा ‘रेड झोन’मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. संजय धोत्रे येथून त्यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या डॉ. रणजित सपकाळ यांचं नाव समोर करण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या इतर प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे, तेल्हारा शहराच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, राजेश नागमते यांची नावे चर्चेत आहेत. 

भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलीये.‌ तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे.

महाविकास आघाडीत जर ठाकरे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास माजी आमदार संजय गावंडे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय शिवा मोहोड, माया म्हैसने, विजय दुतोंडे आणि दिलीप बोचे हेसुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे इच्छूक आहेत. तर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटल्यास माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांचा मुलगा आणि युवानेते महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महिला नेत्या डॉ. संजीवनी बिहाडे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, सहकार नेते हिदायत पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोंद्रे आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड शर्यतीत आहेत. 

या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे. वंचितकडून मागचे पराभूत उमेदवार संतोष रहाटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, काशिराम साबळे यांचाही वंचितच्या उमेदवारीवर दावा आहे.  

या मतदारसंघात प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबरच दोन उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीचीही मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, प्रहारचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा समावेश आहे. 

हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर असलेला आहेय.  या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीय.

4) मुर्तिजापूर : (राखीव : अनुसूचित जाती) 

अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर.  मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहेय. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ. कधीकाळी काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नव्हता असे बोलले जायचे. मात्र, 1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन काँग्रेसही येथून हद्दपार झालीय. अन 1995 पासून 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवलाय. विशेष म्हणजे भाजपला भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतील मतविभाजनाच्या जोरावरच येथे ताकद वाढवता आली आहे. 2009 पासून गेल्या तीन निवडणुकांत भाजपचे हरीश पिंपळे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहेय.. सध्याही भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरु झालीये. 

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 

स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755

 विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे ही स्पर्धा पाहता 2019 च्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार या मतदारसंघात रिंगणात होते त्याहीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी विविध उपक्रम हाती घेतले असून यावेळी ‘मै हु ना’ अशी ग्वाही देत मतदारसंघात जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे  त्यामुळे मुर्तीजापुर मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापल्याचं चित्रं आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे हरीश पिंपळे यांनी फक्त 1910 मतांनी हा मतदारसंघ राखत तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जातांना त्यांचा पहिला संघर्ष असेल तो तिकीट मिळविण्यासाठी. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाला मोठं तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रेंना काँग्रेसपेक्षा 8147 मतांची आघाडी मिळाली होती. 

 या मतदारसंघात पिंपळे यांच्याशिवाय भाजपचे मातंग समाजाचे नेते आणि लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, पंकज सावळे, संघपरिवारातील मनोहर हरणे, राजश्री बोलके यांच्या नावाची चर्चा आहे. 

या मतदारसंघात भाजपनंतर सर्वाधिक चुरस आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. येथे पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीच्या स्पर्धेतून प्रत्येक इच्छूकाने मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती सम्राट डोंगरदिवे, मागच्या निवडणुकीतील उमेदवार रवी राठी, अकोल्यातील पक्षाचे युवानेते आनंद उर्फ पिंटू वानखडे,  गजानन भटकर आणि अमरावतीचे उद्योजक तेजस जामठे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर इच्छूक आहेत. 
   
 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळच्या वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा 1910 मतांनी थोडक्यात पराभव झाला होता. त्यामूळे वंचितकडूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. वंचितकडून प्रामुख्याने मूळचे अकोल्यातील असलेले मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक डॉ. सुगत वाघमारे, 2019 मधील उमेदवार प्रतिभा अवचार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, माजी सभापती आकाश शिरसाठ आणि संजय नाईक यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. या मतदारसंघात सध्या आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थिती आहे. यात त्यांना चौथ्यांदा तिकीट मिळतं का?. मिळालं तर ते ‘अँटी ईन्कमबंसी’चा कसा सामना करतात?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

5) बाळापूर :

विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर म्हणजे बाळापुर… कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर…  त्यामुळेच आजही अकोला जिल्ह्याची बरेच ठिकाणी ओळख ही ‘बाळापुर-अकोला’ अशी आहेय. ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेल्या बाळापुर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहासही काहीसा वेगळ्या वाटणे जाणारा…  अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापुर विधानसभा मतदारसंघ…. कारण गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिलेय. या निवडणुकीत बाळापुरात 3 लाख 9 हजार 127 मतदार आहेत. 

बाळापूर मतदारसंघात 2019 मध्ये प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेली मते : 

शिवसेनेचे (आता उबाठा) नितीन देशमुख 18,788 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
नितीन देशमुख          शिवसेना      69343
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर   वंचित          50555
डॉ. रहेमान खान        एमआयएम   44507

बाळापूर मतदारसंघातील मतदारसंख्या : 

स्त्री : 150199
पुरूष : 158926
तृतीयपंथी : 02
एकूण : 309127

 महायुतीत हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत येथे सध्या ठाकरे गटाचे आमदार असलेले नितीन देशमुख यांनाच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. तर वंचितने येथून काँग्रेसचे माजी आमदार नातीकोद्दीन खतीब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामूळे आता या मतदारसंघात प्रतिक्षा आहे ती महायुतीच्या उमेदवाराची. 
 
 या मतदारसंघावर सर्वात मोठा आणि सक्षम दावा आहे तो शिंदेंच्या शिवसेनेचा. त्या पक्षाकडून पक्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ, युवासेना सचिव आणि माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचा समावेश आहे. तर भाजपचे दोन माजी आमदारही ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करू शकतात. यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते संदीप पाटील लोड आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे इच्छुक आहेत. तर भाजपकडून माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात हे प्रमुख दावेदार आहेत. 

 या मतदारसंघात ठाकरे गट, वंचित आणि भाजपचं मोठं संघटनात्मक जाळं आहे. मतदारसंघातील बाळापूर आणि पातूर नगरपालिकांवर काँग्रेसची सत्ता होती. तर बाळापूर, पातूर पंचायत समित्या वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात आहेत. तर मतदारसंघातील ग्रामीण भागात भाजपचं मोठं संघटनात्मक जाळं आहे. शिवसेना आणि वंचितनं मागील वर्षभरात या मतदारसंघात ताकदीनं पक्षसंघटन बांधलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनुप धोत्रेंना या मतदारसंघात 9 हजार 844 मतांची पिछाडी मिळाली होती. बाळापुरातील लढत हा राज्यभरासाठी ‘हाय होस्टेल ड्रामा’ असणार आहे. कारण, गुवाहाटीवरून परत आल्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने गंभीर आरोप केलेत. त्यामुळे ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला पराभूत करण्यासाठी महायुती बाळापूरात मोठी ताकद लावणार आहे. 

 अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सध्या जाती-पातीची आकडेमोड होतांना दिसत आहे. मात्र, जिल्ह्याचा रखडलेला विकास, मोठे उद्योगधंदे नसल्याने वाढलेली बेरोजगारी, शेती आणि शेतमालाचे प्रश्न, शिक्षण, दळणवळण आणि प्रगतीच्या इतर मुद्द्यांवर दुर्दैवाने कोणतीही चर्चा होतांना दिसत नाही. मतदारच जाती-पातीच्या राजकारणात गु़ंतल्याने विकासाचे मुद्दे या निवडणुकीत कितपत प्रभावी ठरतील?, हाच खरा प्रश्न आहे. मात्र, घोडामैदान जवळच असल्याने अकोल्याच्या राजकारणात कोणता पक्ष किती पाण्यात अन लोकांच्या मनात आहे, याचं उत्तर लवकरच मतदार देणार आहेत.



Source link