Akola Crime News : कुख्यात गुंड गजानन कांबळेला (Gajanan Kamble) कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी चक्क कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केलीय. दरम्यान, कारागृह प्रवेशद्वारासमोर गाडी लावल्यावरून त्यांच्यात हा वाद झाला होता. कारागृह निरीक्षकाने कांबळेंच्या साथीदारांना हटकले असता त्यातला एक सराईत गुन्हेगार लाल्या पालकर यानं कारागृह निरीक्षकासोबतच वाद घातला. दरम्यान, त्याने चक्क अधिकाऱ्याची कॉलर पकडून बंदुकीने उडून देण्याची धमकी (Crime News) दिली. याप्रकरणी अकोल्यातल्या (Akola) सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय

ज्ञानेश्वर बाळसिंग पाटील (38, रा. शासकीय निवासस्थान कारागृह, अकोला) हे अकोला जिल्हा कारागृहाचे निरीक्षक असून पदावर आपली ड्यूटी बजावत होते. त्याचवेळी कारागृहात ‘एमपीडीए’ कारवाई कैद असलेला गजानन कांबळेला भेटण्याकरीता काही जण आले होते. त्यामध्ये सराईत गुन्हेगार असलेला स्वप्निल उर्फ़ लाल्या पालकर हा सुद्धा गजानन कांबळेला भेटण्यासाठी आला होता. त्यातील एकानं कारागृहाच्या मूख्य प्रवेशद्वारासमोर समोर दुचाकी उभी केली. कारागृह अधिकाऱ्यांनी लाल्या पालकरल विचारले की दुचाकी कोणाची आहे, तर त्याने गाडी आपलीच आहे. दुचाकी काढणार नाही, तुमच्यानं ‘जे’ होते ‘ते’ करून घ्या. असे म्हणत आणि अश्लिल शिवीगाळ करत तूला बंदूकीने उडवून जिवाने मारून टाकणार, अशी धमकी दिली. तसेच धक्काबुक्की करून थेट कारागृह निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शर्टची कॉलर पकडून धमकावून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादा दरम्यान कारागृह पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये लाल्या पालकर हा जखमी झालाय. त्यानंतर लाल्या हा घटनास्थळावरून पसार झाला होता. 

कारागृह अधिकाऱ्यांनी या संदर्भात सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली असून स्थानिक पोलिसांनी पालकरसह अन्य दोघांविरुद्ध 353, 294, 506, 34 नूसार गुन्हा दाखल केलाय. कोतवाली पोलिसांच्या डीपी पथकाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत लाल्या पालकर याचा शोध घेतला. त्यानंतर त्याला अटक करत त्याच्यावर उपचार करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांचा एमसीआर केला. सद्यस्थितीत पालकर याला वाशिमच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, लाल्या पालकर वर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर या अगोदर एमपीडीएनूसार कारवाई केली होती.

कोण आहे गजानन कांबळे? 

कुख्यात गुन्हेगार गजानन काशिनाथ कांबळे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीए कारवाई केली होती. त्यानंतर अकोला पोलिसांनी गजाआड करीत कागदोपत्री कारवाई केली. आता एक वर्षासाठी गजानन कांबळे अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध आहे. गजानन कांबळे हे भारतीय रिपब्लिकन पार्टी म्हणजेचं रिपाईचे आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच अनेक राजकीय आणि अधिकाऱ्यांशी त्यांचे संबध आहे.

दरम्यान बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, ठकवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link