अकोला : ‘गे डेटिंग’ अॅपवरुन ओळख, मैत्री आणि त्यानंतर फसवणुकीचा भयावह सापळा… अकोल्यात घडलेली ही घटना समलिंगी व्यक्तींविरोधातील फसवणुकीचे नवीन आणि धोकादायक रूप उघड करतेय. बँकेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला डेटिंग अॅपवरून फसवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 80 हजार रुपये उकळण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.
Akola Gay Dating App News : नेमकं काय घडलं?
अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याने समलैंगिक डेटिंग अॅपवर एका अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला. बोलणं वाढलं आणि मैत्री झाली. त्यानंतर 14 जून रोजी प्रत्यक्ष भेट ठरवण्यात आली. हिंगणा फाट्याजवळ आरोपी मनीष नाईक हा त्या बँक अधिकाऱ्याला भेटला. तिथून दोघं मिळून कारने शहरातील नदीकिनाऱ्यावर गेले, जिथे दोघांत समलैंगिक संबंध झाले.
परंतु, या घटनेनंतर कथानकाने अचानक वळण घेतले. मनीष नाईकने त्याचे तीन साथीदार तिथे बोलावले. या चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आले.
ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक लूट
चित्रीकरण केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित अधिकाऱ्याला धमकावून ब्लॅकमेल केलं गेलं. ‘हा व्हिडीओ व्हायरल करू’ अशी भीती दाखवत सुरुवातीला 30 हजार रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण 79,300 रुपये आरोपींनी उकळले. पीडित अधिकाऱ्याने अखेर खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सविस्तर तक्रार दाखल केली.
पोलिसांची योजना आणि अटकेची कारवाई
तपासादरम्यान पोलिसांकडे आरोपींचा केवळ मोबाईल क्रमांक होता. ठोस पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी रणनीती आखत, पीडित व्यक्तीच्या मदतीने पुन्हा त्या व्यक्तींना भेटण्याची योजना आखली. त्या वेळी मनीष नाईक प्रत्यक्ष स्थळी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या माहितीवरून मयूर बागडे यालाही अटक करण्यात आली.
इंजेक्शनद्वारे शारीरिक नियंत्रण?
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक याच्याकडे काही प्रकारचे उत्तेजक इंजेक्शन होते, जे तो समलैंगिक व्यक्तींना देत असे. या इंजेक्शनच्या प्रभावाने शारीरिक संबंध सहज साधले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही बाब अधिक चिंताजनक बनवते.
पोलीस तपासात फसवणुकीची आणखी प्रकरण येणार समोर?
अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. याशिवाय, अशाच पद्धतीने इतर कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली आहे का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांचं आवाहन
खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार यांनी सांगितलं की, “या प्रकारात इतर अनेक पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या समलैंगिक व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावं, आणि पोलिसांना मदत करावी.”
डेटिंग अॅपचा गैरवापर
ही घटना ‘गे डेटिंग अॅप’चा गैरवापर किती गंभीर स्वरूपात केला जाऊ शकतो, याचं ज्वलंत उदाहरण ठरते. समाजातील एका विशिष्ट गटावर आधारित अॅप्सचा उपयोग फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारासाठी होऊ लागल्यास, त्याचं रूप अत्यंत घातक ठरू शकते.
आणखी वाचा