Mumbaikar Tamilian Slams Annamalai:  “बॉम्बे हे महाराष्ट्रातील शहर नसून अंतरराष्ट्रीय शहर आहे,” असं वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतामधील नेते के. अण्णामलाई सध्या मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. के. अण्णामलाई यांच्या विधानामुळे मराठी विरुद्ध दक्षिण भारतीय म्हणजेच तमीळ असे गट पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे शीव येथील आमदार सेल्वन यांनी के. अण्णामलाई यांची पाठराणख केली आहे. मात्र त्याचवेळी एका तमिळ व्यक्तीने के. अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. के. अण्णामलाई यांना स्वत:च्या राज्यात जिंकता आलं नाही अशी बोचरी आठवण या व्यक्तीने आपल्या फेसबुक पोस्टमधून करुन दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

तमिळ लोकांनाही लाज वाटतेय

“के. अण्णामलाई हा माणूस तमिळ मुंबईकरांना कोणाला मतदान करायचे हे का सांगत आहे?” असा सवाल पोस्टच्या पहिल्याच वाक्यात राजकीय विश्लेषक अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या सुजित नायर यांनी विचारला आहे. “अन्नामलाई यांना मुंबईत येऊन अनावश्यक, चिथावणीखोर विधाने करण्याचा काही अधिकार नव्हता. हा केवळ पक्षीय राजकारणाबद्दलचा विषय नाही. यामुळे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली आहे आणि मुंबईत अनेक दशकांपासून अभिमानाने आणि सन्मानाने राहणाऱ्या तमिळ लोकांनाही लाज वाटत आहे,” असं परखड मत नायर यांनी व्यक्त केलं आहे. 

नेतृत्व नाही राजकीय अहंकार

“स्थानिक निवडणुकांवर लोकांना व्याख्यान देण्यासाठी दुसऱ्या राज्यातील नेत्याने हे अशा प्रकारे येऊन वक्तव्य करावी अशी अपेक्षा कोणी का करेल? तमिळ भाषिक मुंबईकरांना बाहेरून राजकीय सूचनांची आवश्यकता नाही. त्यांच्या वॉर्डात आणि त्यांच्या शहरात कोण त्यांच्या मतदानासाठी पात्र आहेत हे ठरवण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत.अधिक महत्त्वाचे म्हणजे, अन्नामलाईंच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांच्याच राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकू शकलेली नाही. ते स्वतः सुद्धा निवडणूक हरलेत असं असताना तामिळनाडूच्या या राजकारण्याला इतरत्र जाऊन मतदारांना सल्ला देण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? या साऱ्यामुळेच हे नेतृत्व म्हणून नाही तर राजकीय अहंकार म्हणून समोर येत असल्यासारखं वाटतंय,” असंही नायर यांनी म्हटलं आहे.

राजकीय दादागिरीने नव्हे तर…

“मुंबई हे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. हे महाराष्ट्रातील लोकांचे आहे आणि येथे काम करण्यासाठी, जगण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी आलेल्या प्रत्येक भारतीयाचेही ते तितकेच आहे. राजकीय दादागिरीने नव्हे तर परस्पर आदराने हा समतोल साधला गेला आहे. प्रथम, आपण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला पाहिला आहे, मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांमध्ये शांतपणे हलवले गेले. आता आपल्याला अनावश्यक राजकीय हस्तक्षेप दिसतो ज्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याचा धोका आहे. ही सारी पद्धत फार त्रासदायक आहे,” असं विश्लेषणही नायर यांनी केलं आहे.

‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका.

“महाराष्ट्रातील लोक आदरातिथ्य करणारे आणि सहिष्णु आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे शांततेत आणि सन्मानाने राहतात कारण हे शहर सर्वांना जागा देते. कृपया फुटीरतावादी राजकारण किंवा ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका. मुंबईला श्वास घेऊ द्या आणि आम्हाला शांततेत जगत राहू द्या,” असं नायर यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp