अमरावती: शहरामध्ये एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आधी फोर व्हिलरने धडक दिली. नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. एका पोलिस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांची सुरक्षा कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एस आय कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या टू व्हिलरवरून जात असताना त्यांच्या बाईकला एका फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. पाच ते सहा हल्लेखोर यामध्ये असल्याची माहिती असून ते फरार झाले आहेत.
या हल्ल्यामध्ये कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना नजिकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट दिली. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत.
पोलिसांवरील हल्ल्यामुळे शहर हे सुरक्षित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा