Income Tax Department Raids : अमरावती, अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या दुकानावर आज (14 मे 2025)आयकर विभागाने (Income Tax Department) एकाएकी धाडी टाकल्याचे समोर आले आहे. एकता ज्वेलर्सची मुख्य शाखा ही अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात आहे. सध्या एकता ज्वेलर्स हे सराफा दुकान पूर्णपणे बंद असून आतमध्ये आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहे. तर बाहेर तीन वाहनं असून अंदाजे 15 आयकर विभागाचे अधिकारी या प्रकरणी तपासणी करत असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या धाडीमागील नेमकं करण काय? आणि यामध्ये काय घबाड बाहेर येईल? हे तपासणीनंतर कळू शकणार आहे. सोबतच एकता ज्वेलर्सची ब्रांच परतवाडा याठिकाणी सुद्धा असल्याने त्याठिकाणी सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी तपास करताय.
यवतमाळ शहरातील एकता ज्वेलर्स बंद
अमरावती, अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर यवतमाळ शहरातील मेन लाईन परिसरात असलेल्या एकता ज्वेलर्स हे सराफा दुकान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या प्रमुख पेढीवर कारवाई सुरू आहे. त्याच एकता ज्वेलर्सच्या यवतमाळ सराफा दुकानाचे सर्व्हर एकच असल्याने यवतमाळ येथील दुकान बंद आहे. यवतमाळच्या दुकानात प्रत्यक्ष कारवाई सुरू नसली तरी सर्व्हर एकच असल्याने कामकाज ठप्प आहे.
अकोल्यातही कारवाई, सराफा वर्तुळात खळबळ
दुसरीकडे, अकोला शहरातल्या गांधी रोडवरील पाच ते सहा ज्वेलर्सवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पथकांचा यामध्ये समावेश असून आयकर विभागाच्या या कारवाईने अकोल्यातील सराफा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकला 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
मुंबईच्या गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
15 ऑगस्ट 2024 रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. यासंदर्भात शाळेच्या ट्रस्टीनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती.
या बाबत ट्रस्टीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. काल (13 मे ) रात्री यातील 1 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाई लाचलुचपत विभाग करीत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..