Rupali Chakankar : महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवल्याप्रकरणी चहुबाजुंनी टिका होत होती. अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर कायम चर्चेत राहिल्या. यामध्ये कोणते वाद त्यांना भोवले ते पाहूया.
नेमका वाद काय आहे?
अशोक खरात हा नाशिकचा माजी मर्चंट नेव्ही अधिकारी होता. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ/ज्योतिषी म्हणून ओळखवत असे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेलिंगॉ आणि अश्लील व्हिडिओ बनवण्याचे गंभीर आरोप आहेत. खरातच्या कार्यालयातून जवळपास 58 हून अधिक महिलांच्या अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह सापडल्याचे वृत्त आहे. अतिशय फिल्मी पद्धतीने अशोक खरातला अटक झाली आहे आणि SIT (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) तपास करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून हे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये खरातचे पाद्यपूजन करताना किंवा त्याला गुरु मानताना दिसतात. त्या श्री शिवनिका संस्थान/ट्रस्टशी देखील संबंधित होत्या, जिथे खरातचा संबंध होता. या व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 20 मार्च 2026 रोजी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.
रुपाली चाकणकरांची या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया
राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी सांगितले की, खरात हा त्यांचा आध्यात्मिक गुरु होता. संबंध फक्त धार्मिक/आध्यात्मिक होते. व्हायरल व्हिडिओ/फोटो ५-६ वर्ष जुने आहेत. त्या वेळी त्यांच्या कुटुंबाने त्यांना गुरु मानले होते. खरातच्या दुसऱ्या बाजूची म्हणजे आरोपित कृत्यांची माहिती नव्हती. जेव्हा खुलासा झाला तेव्हा त्या आश्चर्यचकित आणि दुखावल्या गेल्या. त्यांच्यावर महिला असल्याने जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी निष्पक्ष तपासासाठी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे. या पाठोपाठ 27 मार्च रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
(हे पण वाचा – रुपाली चाकणकरांनी अनू मलिकलाही वाचवलं’, सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत दिला पुरावा)
इतर आरोप आणि विरोध
शिवसेना (UBT) च्या सुषमा अंधारे यांनी काळ्या जादू (ब्लॅक मॅजिक), तंत्र-मंत्र आणि पीडित महिलांना धमकावल्याचे आरोप केले. त्यांच्या बोटाला जखम झाल्याच्या फोटोवरूनही विवाद झाला. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांना सेक्स रॅकेटचे मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी केले आणि अटकेची मागणी केली. या पाठोपाठ तृप्ती देसाई, रंजना गवांडे यांनी देखील त्यांच्यावर भोंदू बाबांना संरक्षण दिल्याचे आणि तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले. यापूर्वीही चाकणकर विवादात राहिल्या आहेत. उदाहरणार्थ, 2025 मधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात चारित्र्य हननाचे आरोप करण्यात आले होते.