अकोला: बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे.
काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. अश्लील व्हिडीओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकाने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केल्याचं उघड झालंय.
गेल्या चार महिन्यांपासून हे कृत्य
हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत त्या शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी अटकही केली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..