Konkan Shimga Holi Celebration : होळीचा सण देशभरात तितक्याच विविध पद्धतीनी साजरा करण्यात येतो. हिमाचल प्रदेशपासून ते अगदी उत्तर प्रदेशपर्यंत आणि महाराष्ट्रातसुद्धा ही होळी तितक्याच बहुविध परंपरांनुसार साजरा करण्यात येते. कुठं रंग उधळले जातात, कुठे फुलांची उधळण होते, कुठं रंगमिश्रित पाण्यात डुंबून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात येतो, तर कुठं लक्क लाठ्यांचा मार खाऊन ही होळी साजरी होते. अशी ही होळी साजरा करण्याच्या महाराष्ट्रातही तितक्यात एक ना अनेक पद्धती. त्यातही खरी रंगत असते ती म्हणजे कोकणातील होलिकोस्तवाची अर्थात, शिमग्याची. 

Add Zee News as a Preferred Source

वर्षातून कोकणवासियांना ज्या दोन सणांची प्रतीक्षा असते ते सण म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव. याच शिमग्याच्या निमित्तानं कोकणातील अनेक गावांमध्ये परंपरांनुसार ग्रामदेवतांच्या पालख्यासुद्धा निघण्यास सुरुवात झाली आहे, तर काही गावांमध्ये दारोदार जाऊन शंकासूरही हजेरी लावत आहे. मानपान घेऊन हा शंकासूर, पारंपरिक भजनं, गीतांच्या ठेक्यावर ताल धरून शिमग्याचं एक कमाल रुप सादर करत असतानाच होळीचा आणखी एक प्रकार नजर रोखतो. 

देव- दानवाचं युद्ध..

रायगडमधील महाड इथं साजरा होणारी होळी म्हणजे धाडस आणि श्रद्धेचा अजब मेळ. जग प्रचंड पुढं आलं असलं तरीही प्राचीन परंपरेनुसार होळी साजरा करत इथं दरवर्षी ‘देव दानव युद्ध’ होळी पेटवल्यानंतर पार पडतं. महाडच्या या होळीप्रमाणेच चिपळूण तालुक्यातला सावर्डेमध्येसुद्धा शिमगोत्सवाची एक अनोखी प्रथा आहे. जिथं चक्क पेटते निखारे, होळीतील जळती लाकडं एकमेकांवर मारली जातात. 

गावातील प्रमुख गावकरी आपल्या मानाच्या होळीवरून आणतात आणि होल्टे होम खेळणाऱ्या मैदानात आणतात. या खेळात गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहतात, लाकडं पेटवतात. ढोल ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकतात आणि सुमारे तीन फुटांच्या अंतरावरून ती पेटती लाकडं तीन फेरीत तीन वेळा एकमेकांवर फेकतात. इथं एक गट देव असतो, तर दुसरा गट असतो दानव. प्रतिकात्मक स्वरुपात होणाऱ्या या देव- दानव युद्धामध्ये कोणालाही कोणतीही इजा होत नाही, कारण इथं या प्रथेमागचा भार अतिशय महत्त्वाचा असतो. 

कोळीवाड्यांमध्येही होळीचा उत्साह…

कोकणात सध्या होलिकोत्सवाची धूम सुरू असतानाच कोळी वाड्यांमध्येही होळीचा अधिक उत्साह पहायला मिळत आहे. रायगडमध्ये कोळी बांधवांनी आपल्या होड्यांची डागडुजी आणि रंगरंगोटी केलीय. रंगीत कापडी पताका आणि झेंडे लावून होड्या सजवल्या आहेत. होडीचे पूजन करून मान म्हणून मोठा मासा होडीला बांधण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ, नवगाव, रेवस, बोडणी, आग्राव येथील कोळी बांधवांनी या सजवलेल्या होड्यांमधून समुद्रात फेरफटका मारला. यामुळे समुद्रात जणू होड्यांची जत्रा भरल्याचे चित्र पहायला मिळाले. बच्चे कंपनीपासून मोठी मंडळी देखील पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचताना दिसत होती. अरबी समुद्रातील खांदेरी किल्ल्यावर जाऊन तेथील वेताळेश्वराचे दर्शन घेतले आणि यावेळेस मासळीचा हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थना सुद्धा कोळी बांधवांनी केली.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp