Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. आज एकनाथ शिंदे स्वत: रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासह श्रीकांत शिंदे आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता. आजारातून बरे झालेल्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याने ते रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले आहेत.
तब्बल तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घराच्या बाहेर पडले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झालं आहे. त्यांच्या शऱीरात पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. डॉक्टर त्यांचं सीटी स्कॅन करणार आहे.
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतले होते. गावी गेल्यानंतर त्यांची प्रकृती तिथे खालावली होती. मात्र ठाण्यात परतल्यानंतही ते घरातून बाहेर पडले नव्हते. यादरम्यान पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली.
‘मी जनतेचा मुख्यमंत्री’
ठाण्यात परतताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. “जनतेच्या मनात होतं, ते मी केलं आहे. मी जनतेचा मुख्यमंत्री, सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. कॉमन मॅन समजून मी काम केल्याने त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांची भावना साहजिक आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासह होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं सांगितलं आहे. त्यामुळे किंतु परंतु कोणाच्याही मनात नसावा,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
महायुतीत गृहकलह?
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे. तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे..त्यामुळे भाजप-शिवसेनेतील गृहखात्याचा हा कलह शिगेला पोहोचलाय.
महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. मुहूर्त ठरला असला तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. ‘मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला आहे.
महायुतीत गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या अनुभवावरुन गृहमंत्रीपद जेवढं चांगलं तेवढंच अडचणीचं असल्याचं सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.
भाजप आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिपद सोडणार नाहीत हे शिवसेना ओळखून आहे. त्यामुळंच गृहमंत्रिपदावर दावा ठोकून आणखी काहीतरी मोठं पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय.