MNS Shivsena Victory Rally Sushil Kedia New Post: “मी मराठी शिकणार नाही अशी शपथ घेतो, काय करायचं बोल?” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे उद्योजक सुशील केडिया यांनी दिलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या केडिया यांनी वादाला तोंड फुटल्यानंतर काही पोस्ट करत पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी केडिया

“हे पाहा राज ठाकरेजी, आम्हालाही गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आहे आणि तुम्हालाही. आपला देव एक आहे. आपला देश एक आहे. भाषा आणि प्रेमाला संधी द्या लोकांना स्वीकारण्याची. मारलं, फटकावलं, घाबरवलं तर कोणी कशाला शिकेल? केवळ भीती दाखवून शिकणार का?” असा सवाल सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. हा सवाल त्यांनी एक फोटो रिट्वीट करत विचारला आहे. या फोटोमध्ये सुशील केडिया ‘लालाबागचा राजा’च्या चरणी माथा टेकवत असल्याचं दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मराठीत, “जेव्हा शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्य स्थापन केले तेव्हा त्यांनी मराठी भाषा कोणावरही लादली नाही आणि महाराष्ट्रात एकही जागा नसलेल्यांनाही बळजबरी करायची आहे,” असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. याच पोस्टच्या शेवटी त्यांनी, “देवेंद्र फडणवीसजी अशा पराभूतांना नियंत्रित करायला हवे,” असा केडियांनी म्हटलं आहे.

…तर माझ्यासहीत सगळेच प्रेमाने मराठी शिकतील

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना केडिया यांनी, “देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेमुळे माझ्यासहीत सगळे प्रेमाने मराठी बोलतील. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो. हाच कोणी चिरडण्याचा प्रयत्न केला तर आधी लोक त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतील राज ठाकरे!” असं फडणवीसांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

केडियांना राज ठाकरे आज उत्तर देणार?

केडिया यांच्याबद्दल आजच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून केडियांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना, “केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल,” असं म्हटलं आहे.





Source link