नळाला पाणी महिनाभरानंतर, पाणी चोरी जावू नये म्हणून कुलूपबंद ठेवण्याची वेळ
अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाच्या झळा सोसतंय. गावात प्रत्येक घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्यातील प्रत्येक टाकीला कुलूप लावलेलं आहे.मात्र ही कुलूपं लागलीयेत ते आपलं पाणी चोरी न जाण्याच्या भितीने. हे चित्रं आहे 15 हजार लोकसंख्येचं गाव असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या उगवा गावातलं. येथे सध्या पाणी समस्येमुळे नागरिक कासावीस झालेय. गावात सध्या पाणी पुरवठा योजनेचे नळ फक्त महिन्यात एकदाच येतात. तेही अगदी काही वेळेपुरतेच. त्यामूळे शेकडो रूपये मोजून टँकरचं विकत घेतलेलं पाणी चोरी जावू नये म्हणून ते कुलूपबंद ठेवण्याची वेळ उगवेकरांवर आलीये.
….अन् उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं
उगवा हे गाव बाळापूर मतदारसंघात येतं. सध्या ठाकरे गटाचे नितीन देशमुख येथील आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील खारपान पट्ट्यात येत असलेल्या 69 गावांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र नंतर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. आणि उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. सध्या या गावात कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरलीय. येथील गावाकऱ्यांना आता महिनाभरातून एकदाच नळाचं पाणी मिळतंय. या नियोजनशुन्यतेमूळे गावात पाण्याचा दुष्काळ पडलाय आणि याच पाण्याच्या रडगाण्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी आलंय.
सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा
गावात नळ महिनाभर येत नाही. मात्र, प्रशासनाने एकही टँकर गावात अद्याप सुरू केला नाहीये. त्यामूळे गावाकऱ्यांना एका छोट्या टँकरसाठी तब्बल 600-700 रूपये मोजावे लागतायेत. तर गावाच्या पाण्याच्या दुष्काळात ग्रामपंचायतीच्या लेटलतिफी आणि संवेदनेचा तेरावा महिनाही गावकऱ्यांना अनुभवावा लागतोय. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण नुकताच साजरा केलाय. चंद्रावर पाणी शोधू पाहणाऱ्या आपल्या सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा त्यांना आहे. उगव्यात पाण्याच्या टाक्यांना लागलेली कुलूपं ही आपलं सरकार, व्यवस्था आणि आपल्या संस्कार आणि उच्च परंपरांचा नैतिक पराभव आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..