Akola: अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून रोहित धर्मराज संदलकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना अकोल्यातील अग्रेसन चौक परिसरात घडली. या दुर्घटनेनंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी महापालिकेच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत, महापालिका प्रशासनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप

शहरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासांत 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसासोबतच जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांत घरांचे आणि सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. नाले साफसफाई न झाल्यामुळे अनेक भागांत रस्त्यावर नाल्याचं साचलेलं पाणी आले आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. रोहित संदलकर यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. मात्र नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले धोकादायक खड्डे, पावसाचे पाणी आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि आमदार पठाण यांनी केला आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला महापालिका प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली. शहरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली असून, नुकसानभरपाईसाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अकोल्यातील ही घटना प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर मोठा सवाल उपस्थित करत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळेत उपाययोजना न केल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात, असा इशारा देखील आमदारांनी दिला आहे. शहरातील नागरिकांनीही महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत 

सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत: कोकणसह मुंबई ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. अनेक भागात या पावसामुळं वाहतुकीवर परिण झाला आहे. तसेच शेती पिकांना देखील या पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं घरांचे नुकसान झाले आहे. वीड पडून काही भागात लोक देखील दगावले आहेत. 

 

अधिक पाहा..



Source link