Akola Crime News : अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीने एका सडकछाप गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न (Crime News) केलाय. ही विद्यार्थीनी मुर्तिजापूर तालूक्यातील माना पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. ती मुर्तिजापूर येथे शिक्षणासाठी गावावरून ये-जा करीत होती. दरम्यान, गावातीलच एका गुंडप्रवृत्तीच्या तरूणाने तिला धमकावत तिच्यासोबत फोटो काढलेत. या फोटोच्या आधारावर तिला तो ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचाराची (Sexual Abuse) धमकी देत होता. अखेर या विद्यार्थीनीने त्याच्या धमक्यांना घाबरत काल, 26 ऑगस्टला घरी किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. प्रकृती गंभीर असलेल्या या तरुणीवर अकोला जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरूयेत.
दरम्यान, या संपुर्ण प्रकाराबाबत पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती नाहीये. मुलीच्या वडिलांना तक्रार न करण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कुटूंबियांकडून होतो. त्यामुळे भयभीत झालेल्या पिडीत मुलीचे वडील तक्रार न देण्याच्या मनस्थितीत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील गुंडप्रवृत्तीचा तरूण अद्याप मोकाटच असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चिमुकल्यांवरील अत्याचारांच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला
सध्या देशभरातली स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकात्यात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील (Badlapur Crime) चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेला. अशातच राज्यातील अनेक प्रकार आता पुढे येऊ लागले आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांचे प्रकरण ताजे असतानाच अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे.
यात दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. हे कृत्य गावच्या सरपंच पुत्राकडून झाले असून मार्डीच्या जंगलात नेत या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली. मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
शिक्षकाला रोडरोमियो कडून मारहाण
दुसरीकडे अशीच एक घटना वाशिम येथे घडली आहे. यात वाशिमच्या रिठद येथील परिसरातील 8 ते 10 गावचे विद्यार्थी शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येतात. मात्र, वाशिम रिसोड मार्गावरील बस थांब्यावर विद्यार्थ्यांनी घरी परतत असतांना काही रोडरोमियो तरुणींची छेडखाणी करत असल्याचे प्रकरण पुढे आले. दरम्यान शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींना सोडण्यासाठी गेले असता त्यांना काही मुलं छेड काढतांना दिसले. त्यावर शिक्षणाने त्यांना टोकले असता या तरुणांनी चक्क शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या संदर्भात वाशिम ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास वाशिम पोलीस करत आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..