प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हपूर: शिक्षण परिषद विभागाने शाळेतील स्वच्छतागृहाची असुविधा लक्षात घेता, असे काही काम केले आहे जे कोणत्याही हायक्लास शहरातील शाळेला लाजवेल. कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी प्राथमिक शाळेतील बाथरूम आणि टॉयलेट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः त्रासदायक ठिकाण होतं मात्र कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या संकल्पनेअंतर्गत नवी स्वच्छतागृहं उभारण्यात आली आहेत. ज्यामध्ये चकाचक स्वच्छता, पुरेशी प्रकाशव्यवस्था, मुबलक पाणी, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांचे कमोड, बेसिन, युरिनल पॅनचा वापर करण्यात आला आहे.
1 हजार 957 प्राथमिक शाळांपैकी 54 शाळांमध्ये सुसज्ज स्वच्छतागृह
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 हजार 957 प्राथमिक शाळांपैकी पहिल्या टप्प्यात 54 शाळांमध्ये सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. तर येत्या काही महिन्यात जास्तीत जास्त शाळांमध्ये अशीच अत्याधुनिक स्वच्छतागृहं उभारण्याचा मानस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. शाळांमधील हे बदललेलं रूप पाहून पालकही भारावून गेले आहेत.
शाळेच्या इमारती एवढीच स्वच्छतागृहांचीही सुविधा महत्त्वाची
कोल्हापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्याचं आणि शिक्षण विभागाचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे शाळेची इमारत जितकी महत्त्वाची, तितकीच स्वच्छतागृहांचीही सुविधा महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन हे सर्व बदल करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छतेच्या बाबतीतील आदर्श
हा उपक्रम राबवत असताना उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता कायमस्वरूपी टिकून राहावी, आणि स्वच्छतेचा भार कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीवर पडू नये, याचीही विशेष काळजी जिल्हा परिषदेकडून घेण्यात येत आहे. याआधी 100 टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवून शाळा सुरक्षिततेचा महत्त्वाचा टप्पा पार पाडणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आता स्वच्छतेच्या बाबतीतही नवा आदर्श निर्माण केला आहे.