Maharashtra Crime News : झटपट पैसे कमवण्याच्या नादात चोर आणि सराईत गुन्हेगार (Crime News) वाट्टेल त्या थराला जात असतात. त्यात अगदी जीवघेणे कृत्य करण्यासही ते तत्पर असतात.काही प्रमाणात त्यांच्या या कारवाई त्यांना अतिअल्प यशही येतं, मात्र पोलिसांच्या नजरेतून या गुन्हेगारांची क्वचितच सुटका होत असते. अशाच काही चोरीच्या घटनांनी आज राज्यात धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. यात कुठं चक्क एटीएम (ATM) मशीनच लंपास केल्याची घटना घडली आहे, तर कुठं चोरीच्या प्रयत्नात लाखोंची रक्कम डोळ्यादेखत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. 

 थेट एटीएम मशिनच केलं लंपास        

बँकेत दरोडा, एटीएम मधून पैसे गायब झाल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र चोरट्यांनी आता थेट एटीएम मशिनच लंपास केल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लाखमापुर येथे घडली. हे चोरलेले एटीएम मशीन गाडीत ठेवून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. हे चोरटे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गॅस कटरने एटीएम फोडताना आग, लाखोंची रक्कम डोळ्यादेखत भस्मसात

तर दुसरीकडे चोरट्यांकडून एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्नात 13 लाख 61 हजारांची रोकड जळून खाक झालीय. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा भागामध्ये सोमवारी पहाटे 4 वाजता नाशिक रोडवरील माळीवाडा भागात ही घटना घडलीय. यात अज्ञात चोरट्यानी गॅस कटर ने बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी गॅस कटर मुळे एटीएम मधील रोख रकमेने पेट घेतला, या आगीत ATM मधील सर्व रक्कम जळून खाक झाली.

दरम्यान, ही घटना घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांना कुणकुण लागल्याने चोरट्यांनी येथून पळ काढला. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झालीय. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले शोरूम चोरट्यांनी फोडलं

अशीच एक चोरीची घटना अकोल्यात घडली आहे. यात कपड्यांच्या शोरूममधून हजारोंच्या मालावर चोरटयांनी हात साफ केलाय. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकातील नामाकिंत तायेबा  शोरूम मधील हा सर्व प्रकार असून चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकात असलेलं तायेबा शोरूम चोरट्यांनी फोडले आहे. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडलाय. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. पाच ते सहा चोरट्यांनी कपड्यांच्या शोरूमचं शटर वाकवून आत प्रवेश केलाय. शोरूममधील कपडे शर्ट, टिशर्ट आणि पॅंटसह गल्ल्यातील 40 ते 50 हजार रुपये हे चोरटे चोरी करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन पासून शोरूम अगदी 500 मीटरवर अंतरावर आहेय. त्यामुळे कुठेतरी अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा होतोय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link