Navneet Rana on Uddhav Thackeray : बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारावरून (Bangladesh violence) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला. बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. विश्वगुरु शांत का आहेत? असे त्यांनी म्हटले होते. आता यावरून भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.  

नवनीत राणा म्हणाल्या की, जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले.  आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही

त्या पुढे म्हणाल्या की, बांगलादेश वर जे अत्याचार होत आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केला.  तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आज टीका करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला 14 दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल देखील नवनीत राणा यांनी उपस्थित केला. 

तुम्ही फक्त आराम करा

तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त या मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आज फक्त टोमणे द्यायचे, विरोध करायचा म्हणून आज तुम्हाला आठवले. विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने उत्तर दिले आहे, असेही त्यांनी म्हटले. 

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन किती सुरळीत सुरु आहे हे आपण पाहत आहे.  महत्वाचे विषय सोडून इतर विषयाला महत्व दिले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतं आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. मात्र, विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  

आणखी वाचा 

Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..



Source link