अकोला : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. भाजप नेताच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद भाजपला मिळत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, अशी अपेक्षा शिवसेना (Shivsena) शिंदे गटाची आहे. मात्र, गृहमंत्रीपद हेदेखील भाजपकडेच आणि मु्ख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याचा आग्रह असल्याची माहिती आहे. मात्र, गत महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा असताना, गृहमंत्रीपद हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे, शिवसेना ह्या पदासाठी आग्रही आहे. त्यातच, आज पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये गृहमंत्रीपदावरुन चर्चा सुरू असल्याचं म्हटलं. त्यामुळे, गृहमंत्रीपदाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असते त्यांच्याकडेच आत्तापर्यंत राहिल्याचे सांगत, शिवसेनेला चिमटा काढला आहे. 

अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. डॉ.श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद फडणवीसांकडेच राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे अमोल मिटकरी यांनी चिमटा काढला आहे. आधीच शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत, स्वत: एकनाथ शिंदे हेही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आपण नाराज नसून महायुतीचे केंद्रातील नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे, माझा व शिवसेनेचा त्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी, तुम्ही गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘याबाबतची चर्चा महायुतीमध्ये होईल, चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मतदारांनी महायुतीला निवडून दिलेलं आहे. त्या मतदारांना केलेल्या कमिटमेंट त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्या पूर्ण करायच्या आहेत. मला काय मिळालं कोणाला काय मिळालं यापेक्षा जास्त जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. मतांचा वर्षाव केलाय. आता त्यांना आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..



Source link