अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit pawar) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत होती. या चर्चेनंतर आता ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत असून दोन्ही नेत्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर, मी मातोश्रीवर चाललोय, असे गुगली राज ठाकरेंनी टाकल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांच्या एकीचे चर्चा सुरू असतानाचा राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोटच केलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील दोन राष्ट्रवादी (NCP) एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे म्हटले होते. तर, सध्या देश महत्त्वाचा आहे, एकत्र येण्याचं पुन्हा ठरवू असे म्हणत युद्धजन्य परिस्थीताचा संदर्भ सुप्रिया सुळेंनी दिला होता.
राज्यात ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जरा मागे पडली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एकत्र येण्यावरही मिटकरींनी आपलं मत मांडलं. दोन्ही भाऊ एकत्र येणं महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी सुचिन्ह आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी माणसांची ताकद वाढणार आहे, त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर, दोघे भाऊ एकत्र यावा हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जर दोघे भाऊ एकत्रित येत असतील तर त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा, असेही मिटकरींनी म्हटलं.
ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत परिणाम होऊ शकतो
कुणालाही कमजोर समजू नये, दोघे भाऊ एकत्र आल्यास निश्चितच मराठी माणसाची ताकद वाढणार आहे. निश्चितच एकत्र आल्यावर राजकीय समीकरणे बदलणार, अर्थातच परिणाम होणार आहे. दोघे भाऊ एकत्र येत असल्यास त्यांच्या, आणि मराठी माणसाच्या, मुंबईच्या दृष्टीने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीवर काही परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण, महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महायुतीमधील भाजप नेत्यांकडून ठाकरे बंधुंच्या एकीचा मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, मिटकरी आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यात तफावत दिसून येते.
हेही वाचा
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
आणखी वाचा