Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यांवर निशाणा साधतानाच ‘गौतम अदानी हा या निवडणुकीतील ज्वलंत विषय आहे,’ असं म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये,” असं म्हणतानाच राऊतांनी, “महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे,” असं विधान केलं आहे. 

महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही

“मोदी-शहा-फडणवीस व गौतम अदानी हा या निवडणुकीतला ज्वलंत विषय आहे. महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये. मुंबईतील सर्व मोक्याच्या जमिनींचा ताबा अदानी यांना देण्यात आला. मिठागरे, जकात नाके अशा जागांवर अदानी यांनी आताच खुंट्या ठोकल्या. नवी मुंबईत सातारा-पाटण रहिवाशांच्या मेळाव्यात गेलो. तेथील रहिवाशांनी माहिती दिली, ”अदानी आता साताऱ्यातही घुसले.” महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानी यांचे उद्योग बांगलादेश, पाकिस्तानसह अनेक इस्लामी राष्ट्रांत पसरले व त्यामुळे या लोकांचे ‘हिंदुत्व’ धोक्यात आले नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे

मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर…

“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे सध्या महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातला प्रचार संपताच मोदी हे ब्राझीलला रवाना होतील. ब्राझीलमध्ये त्यांच्यासोबत गौतम अदानी असतील काय? कारण मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर अदानी यांच्या कंपनीला त्या त्या देशात मोठे कंत्राट मिळते. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या बैठका गौतम अदानी यांच्याच घरी झाल्या व स्वत: अदानी त्या बैठकांत हजर असायचे, असा स्फोट आता अजित पवार यांनीच केला. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवत आहे व ठाकरे त्यांना का नको होते? ते उघड झाले,” असं राऊत ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या विशेष सदरात म्हणाले आहेत. 

नक्की वाचा >> बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण…; राऊतांचा हल्लाबोल

…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल

“महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील,” असा टोला राऊतांनी लगावला आहे. “मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा,” असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे. 





Source link